वर्ष २०२५ मधील क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेत भारतीय क्रिकेटपटू पाकच्‍या संघात असल्‍याचे दर्शवले !

भारतावर नियंत्रण मिळवल्‍याचा पाकचा व्‍हिडिओ ‘पाकिस्‍तान अन्‍टोल्‍ड’कडून प्रसारित !

नवी देहली – येथील ‘पाकिस्‍तान अन्‍टोल्‍ड’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने पाकमध्‍ये बनवण्‍यात आलेला एक व्‍हिडिओ ‘एक्‍स’वरून प्रसारित केला आहे. सध्‍या चालू असलेल्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेच्‍या अनुषंगाने संघटनेने हा व्‍हिडिओ प्रसारित करून  ‘पाकिस्‍तान्‍यांमध्‍ये हिंदुद्वेष कशा प्रकारे भिनला आहे ?’, हे दाखवले आहे. या व्‍हिडिओसमवेत लिहिण्‍यात आले आहे की, जेव्‍हा पाकिस्‍तानी संघ क्रिकेटचा सामना जिंकतो, तेव्‍हा इस्‍लामचा विजय होतो आणि जेव्‍हा संघ पराजित होतो, तेव्‍हा व्‍हिडिओत दाखवल्‍याप्रमाणे पाकिस्‍तानी लोक दिवास्‍वप्‍ने पाहू लागतात.

१. या व्‍हिडिओमध्‍ये वर्ष २०२५ मध्‍ये टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेचा पाकिस्‍तान आणि इंग्‍लंड या संघांतील सामना दाखवण्‍यात आला आहे. त्‍यात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे पाकिस्‍तानी संघात असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.

२. हा सामना सिरीनगर (काश्‍मीरमधील श्रीनगरला पाकमध्‍ये ‘सिरीनगर’ या नावाने संबोधले जाते) या ठिकाणी चालू असून व्‍हिडिओमध्‍ये एक पाकिस्‍तानी कुटुंब हा सामना घरी दूरचित्रवाणी संचावर पहात असल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे.

३. या वेळी कुटुंबातील एक लहान मुलगी म्‍हणते, आज कोहलीमुळेच पाकिस्‍तान सामना जिंकेल. तेव्‍हा एक वयस्‍कर पाकिस्‍तानी मुसलमान म्‍हणतो, हा कोहली एकेकाळी ‘इंडिया’कडून खेळायचा. तेव्‍हा एक लहान मुलगा ‘इंडिया’ शब्‍द ऐकून ‘कौन इंडिया’, अशा प्रकारे आश्‍चर्य व्‍यक्‍त करत असल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे, जणू ‘इंडिया’ हा शब्‍द त्‍याने प्रथमच ऐकला.

४. या दृश्‍यानंतर अखंड पाकिस्‍तान झाल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे. त्‍यात भगवा रंग असलेली संपूर्ण भारतभूमी पाकिस्‍तानी रंगाने रंगल्‍याचे नकाशात दाखवले आहे.

५. या वेळी ‘गलती से जो ललकारेगा, उसे गाड के रख देंगे । हम पाकिस्‍तानी मुजाहिद हैं, इस धरती के रखवाले हैं !’ असे गीत ऐकवले आहे.

संपादकीय भूमिका

दोन वेळच्‍या खाण्‍याचेही वांदे झालेले पाकिस्‍तानी लोक भारतावर नियंत्रण मिळवल्‍याची आता केवळ अशी हास्‍यास्‍पद दिवास्‍वप्‍नेच पाहू शकतात आणि या कल्‍पनाविलासातील सुख तेवढे अनुभवू शकतात. यामुळे पाकची कितीही कीव केली, तरी ती थोडीच !