आळंदीतील ह.भ.प. कोकरे महाराज यांचे उपोषण मागे

सरकारकडून विविध मागण्‍यांच्‍या चर्चेची सिद्धता !

उपोषणकर्ते ह.भ.प. कोकरे महाराज (डावीकडे)

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्‍यांसह समान नागरी कायदा व्‍हावा, सर्वांना विनामूल्‍य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्‍या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्‍हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते. ‘येत्‍या १० दिवसांत विविध मागण्‍यांच्‍या विषयावर मंत्रालयात चर्चा करू’, असे आश्‍वासन राज्‍यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी दिल्‍यावर १२ नोव्‍हेंबरला कोकरे महाराज यांनी उपोषण मागे घेतले.

या वेळी आमदार रवींद्र धंगेकर, भाजप जिल्‍हाध्‍यक्ष शरद बुट्टे पाटील, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, गोभक्‍त हिंदूभूषण मिलिंदजी एकबोटे, देहू देवस्‍थानचे प्रमुख विश्‍वस्‍त पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी यांसह अन्‍य उपस्‍थित होते. उपोषण सोडल्‍यानंतर ‘श्री रामकृष्‍ण वारकरी शिक्षण संस्‍थे’च्‍या वतीने वारकरी संप्रदायास महाप्रसाद वाटप करण्‍यात आले.