उत्तरकाशीत बांधकाम चालू असलेला बोगदा कोसळल्याने ३६ कामगार अडकले !

साहाय्यता कार्य चालू !

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथे बांधकाम चालू असलेला बोगदा कोसळल्याने त्याच्या ढिगार्‍याखाली अनुमाने ३६ कामगार अडकले आहेत. ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव यांच्यामध्ये हा बोगदा बांधला जात आहे. सध्या बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवले जात आहे. १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता ही घटना घडली.

हा बोगदा ४ कि.मी. लांबीचा असून बोगद्याचा १५० मीटरचा भाग कोसळला. अधिकार्‍यांच्या अंदाजानुसार कामगारांना बाहेर काढण्यासाठी २ ते ३ दिवस लागू शकतात. येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि राज्य आपत्ती निवारण पथक, तसेच अन्य यंत्रणा साहाय्यता कार्य करत आहेत. हा बोगदा चारधाम रोड प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. त्याच्या बांधकामानंतर, उत्तरकाशी ते यमुनोत्री धाममधील अंतर २६ कि.मी.ने अल्प होणार आहे.