कॅनडाचे पंतप्रधान यांची निज्जर हत्येवरून भारतावर पुन्हा टीका !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या एका नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे हस्तक सहभागी असू शकतात, असे मानण्याची आमच्याकडे गंभीर कारणे आहेत. यावर भारताची आलेली प्रतिक्रिया ही ‘व्हिएन्ना करारा’चे उल्लंघन करून कॅनडाच्या अधिकार्यांच्या मोठ्या समुहाला बाहेर काढणे, ही होती. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की, आपले राजनैतिक अधिकारी दुसर्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले. खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
सौजन्य एकॉनॉमिक टाइम्स
ट्रुडो पुढे म्हणाले की, आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना हत्येच्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास सांगितले होते. सहकार्य करण्याची विनंती केली होती. आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाचे सार्वभौमत्वाचे उल्लंघन, यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही फार गांभीर्याने घेत आहोत. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा रहाणारा देश आहे; कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली आणि मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल.
संपादकीय भूमिका‘एखाद्या देशावर पुरावे न देता हत्येचा आरोप करणे, हे धोकादायक नाही का ?’ याचे उत्तर ट्रुडो देतील का ? |