सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील प्रत्येक प्रवर्गाला जनगणना झाल्यानंतर त्यांना त्याविषयी न्याय मिळावा. अन्यथा निवडणुका घेऊ नका. राजकारण थांबवा आणि तातडीने मराठा आरक्षणाविषयी ठोस भूमिका घोषित करा. अन्यथा पुढची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. मराठा आरक्षणावर राज्य सरकारने कोणतेही राजकारण न करता तातडीने श्वेतपत्रिका काढावी, असे आवाहन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा सातारा येथे आले. १८० किलोमीटरचा पायी प्रवास करून ८ नोव्हेंबर या दिवशी उदयनराजे यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी हे युवक पोचले. या दोन्ही युवकांची उदयनराजे यांनी आस्थेने चौकशी केली. या दोन्ही युवकांनी आरक्षणाविषयी त्यांच्या रक्ताने लिहिलेले पत्र उदयनराजे यांना दिले.