सोलापूर येथील अमली पदार्थ बनवणार्‍या कारखान्यावर नाशिक पोलिसांची कारवाई !

प्रतीकात्मक छायाचित्र

सोलापूर – मोहोळ औद्योगिक वसाहतीत ‘मॅफेड्रॉन’ नावाचा अमली पदार्थ बनवणार्‍या कारखान्यावर नाशिक येथील अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत ९ किलो ६९० ग्रॅम ‘मॅफेड्रॉन’, तसेच हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि द्रव्य रसायन असे १ कोटी ९ लाख ११ सहस्र ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

नाशिक रस्ता पोलिसांनी अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणांत आतापर्यंत ८ संशयितांना अटक केली आहे. यापैकी मुख्य संशयित आरोपी सनी पगारे याची चौकशी केली असता सोलापूर जिल्ह्यातून ‘मॅफेड्रॉन’चा पुरवठा होत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार म्हणून मोहोळ (जिल्हा सोलापूर) येथील वैजनाथ सुरेश हावळे यांनी कारखाना चालू करण्यासाठी साहाय्य केल्याची माहिती समोर आली आहे.