असा हिशेब करायला लागलो, तर अनेक नेते अडचणीत येतील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एल्विश यादव याने आरती केल्याचे प्रकरण

नागपूर – गणेशोत्सवात अनेक कलाकार आणि मान्यवर यांना बोलावले जाते. ‘यूट्युबर’ एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी सिझन-२’ जिंकला, त्या वेळी त्याच्यावर कोणताही आरोप नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाहक गदारोळ करणे योग्य नाही. असा हिशोब करायला लागलो, तर अनेक राजकीय नेत्यांना अडचणी येतील, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे ४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना येथे दिली.

यूट्युबर एल्विश यादव याच्या विरुद्ध रेव्ह पार्टी आयोजित केल्याविषयी आणि त्यात सापाचे विष वापरल्याविषयी गुन्हा नोंद केला आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आरती करतांना यूट्युबर एल्विश यादव याचे एक छायाचित्र ट्वीट करत काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलतांना फडणवीस यांनी वरील विधान केले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ड्रग्ज संदर्भातील प्रकरणात सहभागी असणार्‍यांसाठी तेवढेच कडक कायदे आहेत. राज्यात ड्रग्स विरोधी अभियान चालू आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही या अभियानाच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे. यामध्ये पोलीस सहभागी असतील, तर त्यांना बडतर्फ केले जाईल. त्यामुळे राजकीय लोकांनी विचार करून आरोप करावेत.