गोवा सरकार संस्कृत पाठशाळा आणि केंद्रे यांना अनुदान देणार !

संस्कृत भाषा आणि वेद यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकारची स्तुत्य योजना !

पणजी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) : संस्कृत भाषा आणि वेद यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी गोवा सरकार पारंपरिक निवासी गुरुकुल पद्धतीवर चालणार्‍या संस्कृत पाठशाळा अन् केंद्र यांना आर्थिक अनुदान देणार आहे. २०२३-२४ या चालू शैक्षणिक वर्षापासून हे अनुदान दिले जाणार आहे. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंबंधी अधिसूचना काढली आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, संस्कृत पाठशाळांना अनुदान देण्याचा गोवा सरकारचा पूर्वीपासून विचार होता आणि आता याला मूर्तस्वरूप आले आहे. या योजनेमुळे संस्कृत पाठशाळा आणि केंद्र यांच्या व्यवस्थापनाला त्यांच्या ठिकाणच्या साधनसुविधेत वाढ करण्यासाठी हातभार लाभणार आहे. गोव्यात प्रत्येकी ३ संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत केंद्रे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सरकार संबंधित संस्थांना १०० टक्के वेतन अनुदान, तसेच पाठशाळेसाठी वार्षिक देखभाल खर्च ५ लाख रुपये आणि संस्कृत केंद्रासाठी १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

पाठशाळा आणि केंद्र येथील प्रत्येक विद्यार्थ्याला ११ मासांसाठी किंवा जेवढे दिवस वर्ग चालणार, तेवढे दिवस खाण्या-पिण्यासाठी प्रतिदिन ७० रुपये दिले जाणार आहेत. वेतनबाह्य अनुदान २ टप्प्यांत दिले जाणार आहे. पहिला टप्पा प्रतिवर्षी ऑगस्टमध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी मासात दिला जाणार आहे; मात्र यासाठी प्रतिवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पाठशाळा किंवा केंद्र यांनी आर्थिक ताळेबंद (ऑडिट स्टेटमेंट) खात्याला देणे बंधनकारक आहे.