‘संयम ठेवून यशाची वाट पहाणे’ ही तपश्चर्याच आहे !

पू. संदीप आळशी

‘काही साधक काही वर्षे साधना करत असूनही अपेक्षित अशा आध्यात्मिक प्रगतीच्या स्वरूपात यशाची प्राप्ती होतांना त्यांना दिसत नाही. त्यामुळे काही वेळा ते निराश होतात किंवा ‘आता माझ्या साधनेने माझी प्रगती होऊ शकते’ असा त्यांचा आत्मविश्वासच न्यून व्हायला लागतो.

कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी संयम ठेवावाच लागतो; कारण ‘तो ठेवणे’ हीसुद्धा एकप्रकारे तपश्चर्याच आहे. संयम ठेवण्याच्या माध्यमातून मन स्थिर राहून ते मनाच्या कोणत्याही प्रतिकूल स्थितीशी लढण्यासाठी सिद्ध होते. कित्येक ऋषिमुनी, संत आदींनी कैक वर्षे ईश्वरावर श्रद्धा आणि संयम ठेवून तपश्चर्या केली अन् त्याचेच फळ म्हणून त्यांना अखेर ईश्वरप्राप्ती झाली ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘वर्ष २०२५ पर्यंत ईश्वरी राज्य स्थापन होईल’ हे ध्येय साधकांसमोर ठेवले आणि त्यासाठी साधकांना कृतीप्रवणही केले. ईश्वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेच्या कार्याला विरोध, म्हणून आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर आणि त्यांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेवर अनेक संकटे आली; पण तरीही त्यांनी त्या संकटांवर श्रद्धेने मात करून आणि संयम ठेवून आजही ते ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेतच. यामुळेच त्यांचे ईश्वरी राज्याचे स्वप्न साकारही होणार आहे.

साधनेत अपेक्षित प्रगती न होण्याची विविध कारणे असतात. ती समजून घेण्यासाठी साधकांनी आवश्यकता वाटल्यास आपल्या दायित्व-सेवकांशी बोलावे आणि त्यांच्याकडून साधनेच्या प्रयत्नांविषयी मार्गदर्शन घ्यावे. प्रगती होत नसल्यामुळे निराशा आली असल्यास किंवा आत्मविश्वास अल्प झाला असल्यास त्यासंदर्भात आवश्यकतेनुसार स्वयंसूचना घ्याव्यात.

आजच्या काळोख्या रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषःकाल दडलेला असतो. त्या उषःकालाची आपण चिकाटीने वाट पाहिली, तरच साधनेच्या पुढच्या प्रयत्नांचीही वाट दिसू लागते. त्यामुळे साधकांनी श्रद्धा आणि संयम ठेवून साधनेची वाटचाल करत रहावी.’

– (पू.) संदीप आळशी (२७.९.२०२३)