पुणे येथील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखली !

  • मराठा आरक्षणाचे प्रकरण

  • मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

  • नागरिकांचे हाल

पुणे – मराठा आरक्षणाच्या प्रकरणी पुणे-बेंगळुरू महामार्गावर आंदोलकांकडून ‘रास्ता रोको’ करण्यात आला. आंदोलकांनी नवल पुलाजवळ टायर जाळले. यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याचा परिणाम म्हणून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते; मात्र आंदोलक माघार घेण्यास सिद्ध नव्हते. ‘जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही’, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे आंदोलन चालू असतांना रुग्णवाहिका आणि शाांळच्या बसगाड्या यांना वाट करून रस्ता मोकळा करून देण्यात आला; मात्र पुढे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याने या महामार्गावरील वाहने आणि प्रवासी अडकून पडले होते. यामुळे नागरिकांना मोठी असुविधा झाली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी शांततेचे आवाहन केले आहे.

उपोषणाला पुण्यातून मिळणारा प्रतिसाद !

१. शहरात बावधनमध्ये बंद पुकारण्यात आला असून ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. जांभुळवाडी गावामध्येही ग्रामस्थांनी एकत्र येऊन या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातही साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. कर्वेनगर तसेच शिवणे परिसरातही ‘मशाल मोर्चा’ काढण्यात आला.

२. पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकातून बीड आणि लातूर या शहरात जाणार्‍या दिवसभरातील एकूण १८ फेर्‍या रहित केल्या आहेत.

३. वाघोली परिसरातील नागरिकांनी ‘मनोज जरांगे पाटील’ यांना पाठिंबा देण्यासाठी ३० ऑक्टोबरच्या रात्री ‘कँडल मार्च’ (मेणबत्ती घेऊन काढलेला मोर्चा) काढला. या मार्चमध्ये ३०० पेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग होता. पुणे शहरामध्ये मराठा आरक्षण आंदोलनास उपोषण, कँडल मार्च, अन्नत्याग करून पाठिंबा देण्यात आला.

४. बारामती येथील मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन चालू केले आहे. यात ४ जणांनी अन्नत्याग केला आहे.

५. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी कोंढवा परिसरातील ‘दि मुस्लिम फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष गफूर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुसलमान समाजातील नागरिकांनी एक दिवसाचे लक्षणिक उपोषण केले.

६. मराठा आरक्षणासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी ‘खासदारकी’चा त्याग करावा. महाराष्ट्रातील सर्वच खासदारांनी त्यागपत्र देऊन केंद्रावर दबाव आणावा, असे आवाहन एका मराठा आंदोलकाने केले आहे, असा ‘ऑडिओ’ संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

७. पिंपरी येथे आरक्षण न देणार्‍या सरकारचा ‘दशक्रिया विधी’ घालत आंदोलकांनी मुंडन केले. निर्णय लवकर घेतला नाही, तर अधिक तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी आंदोलक सतीश काळे यांनी दिली आहे.