मराठा आरक्षणप्रकरणी राज्‍यात हिंसक पडसाद !

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले !

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने चालू आहेत. ३० ऑक्‍टोबर या दिवशी जिल्‍ह्यातील गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. या वेळी कार्यालयातील सामानाची नासधूस करण्‍यात आली. अचानक आलेल्‍या मराठा आंदोलकांनी बंब यांच्‍या कार्यालयातील काचा फोडून आसंदीही तोडल्‍या. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्‍या, तसेच बंब यांचे कार्यालय फोडल्‍यानंतर गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आंदोलकांनी ‘रस्‍ता बंद’ आंदोलन केले. या वेळीही आंदोलकांनी सरकारच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या. गंगापूर पोलिसांनी घटनास्‍थळी जाऊन आंदोलकांना कह्यात घेऊन रस्‍ता मोकळा केला.

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्याचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्‍या घरासमोर मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्‍या. या वेळी जलील यांनी आंदोलकांशी चर्चा करत आपला मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी पाठिंबा आहे, असे सांगितले.


सरकारला आणखी एक मृत्‍यू होऊ द्यायचा असेल, तर होऊ द्या ! : मनोज जरांगे उपोषणावर ठाम !      

सरकारचा निर्णय अमान्‍य !

जालना – सरकारला केवळ मराठ्यांचे मृत्‍यू होऊ द्यायचे आहेत. सरकारला आणखी एक मृत्‍यू होऊ द्यायचा असेल, तर होऊ द्या; पण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाल्‍याविना हे आंदोलन आता थांबणार नाही, असा निर्धार ३० ऑक्‍टोबर या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. आता कुठे आंदोलनाचा दुसरा टप्‍पा चालू आहे. अजून बरेच टप्‍पे आहेत. ते टप्‍पे सरकारला जड जातील, अशी चेतावणी देत १ नोव्‍हेंबरपासून आंदोलनाच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍याची घोषणा त्‍यांनी केली. गावकर्‍यांच्‍या आग्रहाखातर मनोज जरांगे थोडे पाणी प्‍यायले.

मराठा समाजातील ज्‍यांच्‍याकडे कुणबी असल्‍याचे पुरावे सापडले आहेत, त्‍यांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र देण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावर जरांगे पाटील म्‍हणाले, ‘‘सरकारचा हा निर्णय आपल्‍याला मान्‍य नाही. ज्‍यांच्‍याकडे पुरावे सापडले आहेत त्‍यांनाच आरक्षण आणि ज्‍यांच्‍याकडे पुरावे नाहीत, त्‍यांनी काय करायचे ? एका भावाला एक न्‍याय आणि दुसर्‍या भावाला दुसरा न्‍याय, असे चालणार नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्‍याविना आंदोलन थांबणार नाही.’’


मराठा आरक्षणासाठी मी माझ्‍या पदाचे त्‍यागपत्र देत आहे ! – लक्ष्मण पवार, आमदार, भाजप

बीड – गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण माधवराव पवार यांनी त्‍यांच्‍या पदाचे त्‍यागपत्र दिले आहे. ‘आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्‍या भावना तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा असून त्‍यासाठी मी माझ्‍या पदाचे त्‍यागपत्र देत आहे’, असे त्‍यागपत्रात म्‍हटले आहे.


विशेष अधिवेशन बोलावण्‍याची मागणी करणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

कोल्‍हापूर – मराठा आरक्षणाच्‍या मागणीला माझा पाठिंबा आहे. आरक्षणाचा सकारात्‍मक निर्णय होण्‍यासाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्‍याची मागणी मी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे करणार आहे. जोपर्यंत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्‍हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सकल मराठा समाजाच्‍या वतीने दसरा चौकात साखळी उपोषण चालू आहे. त्‍याला पाठिंबा देण्‍यासाठी मुश्रीफ यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्‍या वेळी त्‍यांनी हे प्रतिपादन केले.

१. काँग्रेसच्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील ६ आमदारांनी सर्व राजकीय कार्यक्रमांना स्‍थगिती देऊन मराठा समाजासमवेत उभे रहाण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील कोल्‍हापूर शहर ‘काँग्रेस कमिटी’ येथे बैठक घेण्‍यात आली. त्‍यात हा निर्णय घेण्‍यात आला.

२. मराठा आरक्षणाच्‍या राज्‍यस्‍तरीय उपसमितीचे अध्‍यक्षपद मराठा मंत्र्यांकडे असतांना त्‍यांच्‍याऐवजी अमराठा नेता चर्चेला पाठवला जातो, याचा निषेध करून उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र द्यावे, अशी मागणी कोल्‍हापुरात मराठा समाजाच्‍या समन्‍वयकांनी केली. दसरा चौकात सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.


अहिल्‍यानगर येथे मराठा आंदोलकांनी शिक्षकांच्‍या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांच्‍या छायाचित्राचा ‘बॅनर’ !

अहिल्‍यानगर – येथे २९ ऑक्‍टोबर या दिवशी महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक महासंघाच्‍या वतीने भव्‍य राज्‍यस्‍तरीय महामंडळ सदस्‍य त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाच्‍या बोर्डवर राज्‍याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे छायाचित्र लावण्‍यात आले होते; मात्र सध्‍या राज्‍यामध्‍ये आरक्षण प्रश्‍न चांगलाच पेटला असून सर्व नेत्‍यांना गावबंदी करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांनी अधिवेशनात घुसून व्‍यासपिठावर लावण्‍यात आलेला मंत्र्याचा ‘बॅनर’ फाडला. कार्यकर्त्‍यांची आक्रमकता पाहून आयोजकांनी स्‍वत:हून हा ‘बॅनर’ खाली उतरवून घेतला. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सर्व शिक्षकांनीही या आरक्षणाला पाठिंबा दिला असून त्‍यांनी लगेचच मंत्र्यांचे छायाचित्र असलेला ‘फ्‍लेक्‍स बोर्ड’ काढून टाकला आहे.

हे अधिवेशन राज्‍याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्‍या उपस्‍थितीत होणार होते.


खासदार सुनील तटकरे यांना काळे झेंडे दाखवले

ठाणे येथे मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांची कृती !

ठाणे, ३० ऑक्‍टोबर (वार्ता.) – राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाचे महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ठाणे येथे मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांनी काळे झेंडे दाखवले. येथे सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्‍यात आली होती. तटकरे पत्रकार परिषदेसाठी राष्‍ट्रवादीच्‍या कार्यालयात येत असतांना अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते तेथे आले आणि त्‍यांनी वरील प्रकार केले. पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेतले.