महिलांसंबंधी गुन्ह्यांच्या आरोपींवर उत्तरप्रदेश पोलिसांकडून कठोर कारवाई !

  • योगी आदित्यनाथ यांच्या रोखठोक भूमिकेमुळे झालेला परिणाम !

  • आरोपींशी उडालेल्या चकमकीत १ जण ठार, तर दुसर्‍याच्या पायात लागली गोळी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात महिलांच्या विरोधात होत असलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करू लागले आहेत. याच्या २ घटना राज्यातील गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडा येथे घडल्या. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकार्‍यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत बैठक झाली. त्या वेळी त्यांनी, ‘महिलांच्या विरोधात ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हा घडेल, त्या क्षेत्रातील पोलिसांनी त्या विरोधात त्वरित कारवाई केली नाही, तर संबंधित पोलीस अधिकार्‍याला त्यास उत्तरदायी धरण्यात येईल’, अशी सूचना केली होती. यावरून प्रत्यक्ष कारवाई चालू झाल्याचे दिसत आहे.

१. पहिले उदाहरण गाझियाबाद येथील असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या कीर्ती नावाच्या तरुणीला घायाळ करून तिचा भ्रमणभाष पळवण्यात आला होता. या वेळी तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारांच्या वेळी तिचा मृत्यू झाला. तिचा भ्रमणभाष चोरणार्‍या एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी फरार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने गोळीबार केल्याने पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या पायाला गोळी लागली. उपचारांच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.

२. दुसरी गटना ही ग्रेटर नोएडा येथील असून ‘ब्लिंक इट’ आस्थापनाच्या ‘डिलिव्हरी बॉय’ने एका युवतीच्या घरी सामान पोचवतांना ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्याने त्याने पळ काढला; परंतु पोलिसांनी त्याचा शोध लावून त्याला अटक केली. या वेळी त्याने पोलिसांचीच पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाला.

३. योगी आदित्यनाथ यांनी ‘महिलांच्या विरोधातील गुन्हे थांबावेत’, यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचा प्रत्यय पोलिसांच्या या कारवाईतून दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

केवळ उत्तरप्रदेशात नाही, तर देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम आखणे अपेक्षित !