सावंतवाडी येथील प्रकार
सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील नगरपरिषदेची रुग्णवाहिका वाहनचालकाच्या नियुक्तीअभावी वर्षभर नगरपरिषदेच्या आवारात वापराविना उभी आहे. अनेकदा रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयात भरती करण्यास विलंब झाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागतात. ग्रामीण भागातून न्यून किमतीत रुग्णांना शहरात आणण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून २२ लाख रुपये खर्चून मा. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्ष २०२२ मध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती; परंतु ‘विकासकामांवर लाखो रुपये खर्च करणार्या आणि नागरिकांकडून पाणीपट्टी, घरपट्टी कराद्वारे ५ कोटी रुपये महसूल जमा होऊनही रुग्णवाहिकेसाठी चालक नेमला जात नाही’, असा आरोप तक्रारकर्ते श्री. वीरेश ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी अनेक स्तरांवर याची तक्रार केली आहे. (रुग्णांच्या जिवाविषयी काहीच गांभीर्य नसणारे अधिकारी इतर कामे कशी करत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)
संपादकीय भूमिका२२ लाखांहून अधिक किमतीची रुग्णवाहिका चालकाअभावी धूळ खात पडून रहाणे, हे अक्षम्य निष्काळजीपणाचे लक्षण आहे. अशा निष्काळजी अधिकार्यांना कामावरून बडतर्फच करायला हवे ! |