सोलापूर येथील हिंदु एकता दिंडीच्‍या प्रसाराचे आयोजन करतांना साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेले अनुभव अन् अनुभूती

‘२८.५.२०२३ या दिवशी सोलापूर येथे हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते. साधक आणि धर्मप्रेमी यांना दिंडीचा प्रसार करतांना आलेले वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभव येथे दिले आहेत.

१. एक साधक, सोलापूर 

१ अ. अधिकाधिक धर्माभिमान्‍यांनी दिंडीमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी केलेले प्रयत्न !

१. ‘आम्‍ही दिंडीचा प्रसार करतांना अनेक धर्मप्रेमींना निमंत्रण देत होतो. त्‍यांपैकी काही धर्मप्रेमी नियमित संपर्कातील नसूनसुद्धा त्‍यांचा सकारात्‍मक प्रतिसाद असायचा.

२. नवीन असूनही काही धर्मप्रेमी ‘आम्‍ही ५० ते ६० जणांना हिंदु एकता दिंडीला घेऊन येऊ’, असे सांगायचे. त्‍यासाठी ते स्‍वतःच बैठकांचे आयोजन करायचे.

३. आम्‍ही जेव्‍हा दिंडीच्‍या प्रसाराच्‍या कालावधीत धर्मप्रेमींना भेटायचो, त्‍या वेळी प्रत्‍येक जण ‘आम्‍ही १० ते १५ जणांना घेऊन दिंडीमध्‍ये सहभागी होऊ’, असे आम्‍हाला सांगायचा.

४. दिंडीच्‍या प्रसाराच्‍या बैठका घेण्‍यासाठी धर्मप्रेमींना भ्रमणभाष केल्‍यावर आणि त्‍यांना दिंडींचा विषय सांगितल्‍यावर ते स्‍वतः इतर धर्मप्रेमींना बैठकांना बोलवायचे. त्‍यामुळे बैठकांना पुष्‍कळ उपस्‍थितीही असायची.

५. सोलापूर येथील मुळेवाडी या नवीन भागात संपर्क केल्‍यावर तिथल्‍या धर्मप्रेमींनी ‘आम्‍हाला तुमच्‍यासारख्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांची आवश्‍यकता होती. आम्‍हाला तुम्‍हीच दिशा द्या. तुम्‍ही सांगाल, तसे आम्‍ही करतो’, असे उद़्‍गार काढले. तिथे २० ते ३५ धर्मप्रेमींच्‍या उपस्‍थितीत दोन बैठका झाल्‍या.

६. मुळेवाडी येथील वैशिष्‍ट्य म्‍हणजे या गावात ५० टक्‍के इतर धर्मीय असतांनाही तेथे हिंदु एकता दिंडीसाठी बैठका झाल्‍या. त्‍यालाही २० धर्मप्रेमींची उपस्‍थिती होती.

या वेळी धर्मप्रेमींनी ‘अधिकाधिक धर्माभिमान्‍यांनी दिंडीत सहभागी व्‍हावे’, यासाठी पुष्‍कळ चांगले प्रयत्न केले.

१ आ. भगवे झेंडे असलेल्‍या एका वस्‍तीच्‍या ठिकाणी आलेले अनुभव

१ आ १. एका वस्‍तीवर भगवे झेंडे लावलेले एक धर्मप्रेमी आणि त्‍यांच्‍या पत्नी यांना हिंदु एकता दिंडीसाठी साधकांना संपर्क करण्‍याची इच्‍छा असणे अन् त्‍यांना भेटल्‍यावर ते पुष्‍कळ आनंदी होणे : एकदा प्रसाराच्‍या वेळी महामार्गावरून (हायवेवरून) जातांना एका वस्‍तीवर भगवे झेंडे दिसले. ‘हे भगवे झेंडे लावलेल्‍या व्‍यक्‍ती नक्‍कीच धर्मप्रेमी असणार’, असा विचार आमच्‍या मनात आला. त्‍या धर्मप्रेमींचा शोध घेत गेल्‍यावर ‘झेंडे लावलेले ते गृहस्‍थ आणि त्‍यांच्‍या पत्नी प्रखर धर्मप्रेमी आहेत’, असे आम्‍हाला समजले. आम्‍ही त्‍यांची भेट घेतल्‍यावर त्‍यांच्‍या अंगावर रोमांंच आले आणि त्‍यांना आनंद झाला; कारण त्‍याच दिवशी ते आम्‍हाला संपर्क करणार होते.

१ आ २. धर्मप्रेमींच्‍या पत्नीने सुटी घेऊन बैठकीची पूर्वसिद्धता मनापासून करणे : त्‍यानंतर त्‍या दोघांनी एका बैठकीचे आयोजन केले. बैठकीची पूर्वसिद्धता पुष्‍कळ मनापासून केली होती. त्‍यांनी दुपारी जेवणापेक्षासुद्धा या बैठकीच्‍या सिद्धतेला प्राधान्‍य दिले. इतर वेळी त्‍यांच्‍या पत्नी कोणत्‍याही कार्यक्रमासाठी सुटी घेत नाहीत; पण त्‍यांनी सर्व महिलांना बैठकीला बोलावण्‍यासाठी त्‍या दिवशी सुटी घेतली. बैठकीला एकूण २२ जण आले होते.

१ आ ३. हिंदु एकता दिंडीला आल्‍यावर धर्मप्रेमींना आलेल्‍या अनुभूती

अ. ‘आम्‍ही दिंडीला आल्‍यामुळे आम्‍हाला धन्‍य झाल्‍यासारखे वाटले’, असे काही धर्मप्रेमींनी सांगितले.

आ. काही जणांची ‘चालता येईल कि नाही?, अशी परिस्‍थिती होती; पण दिंडीत इतके चालूनही त्‍यांना काहीच त्रास जाणवला नाही.

१ इ. धर्मप्रेमींनी साहित्‍य अर्पण देण्‍यासाठी साहाय्‍य करणे

दिंडीची सेवा करतांना बरेच साहित्‍य लागणार असल्‍याचे धर्मप्रेमींना सांगितल्‍यावर ते उत्‍स्‍फूर्तपणे म्‍हणाले, ‘आम्‍ही साहित्‍य अर्पण देऊ.’

१ ई. धर्मप्रेमींना सरबताचे वाटप करणारे सोलापूर येथील श्री. राधेश्‍याम गोरट्याल !

सोलापूर येथील श्री. राधेश्‍याम गोरट्याल हे चहाचे व्‍यापारी आहेत. त्‍यांच्‍या इतर व्‍यापारी मित्रांसमवेत त्‍यांनी सभा संपण्‍याच्‍या वेळी सहस्रो धर्मप्रेमींना सरबताचे वाटप केले. ‘ही सेवा अधिकाधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण व्‍हावी’, यासाठी त्‍यांनी बैठका घेतल्‍या.

१ उ. ‘वर्ष २०२४ मध्‍येच हिंदु राष्‍ट्र येणार आहे’, असे दिंडीमध्‍ये सहभाग घेतल्‍यानंतर वाटत असल्‍याचे एका धर्मप्रेमींनी सांगितले.

२. श्री. मिनेश पुजारे,  सोलापूर   

श्री. मिनेश पुजारे

अ. ‘श्री. नामदेव पुलगम यांना हिंदु एकता दिंडीचा विषय सांगितला. त्‍या वेळी त्‍यांनी ‘माझ्‍याकडून सर्वांना लिमलेटच्‍या गोळ्‍या द्या’, असे सांगून लगेच ५०० रुपये अर्पण दिले.

आ. ‘श्री. श्रीहरि बोडा यांनी दिंडीचे कौतुक करत पुष्‍कळ सुंदर नियोजन केले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.

इ. स्‍वसंरक्षण प्रशिक्षण प्रकारांचा सराव चालू असतांना ‘तुम्‍ही सुंदर प्रात्‍यक्षिके सादरीकरण करत आहात’, असे समाजातील एका व्‍यक्‍तीने कौतुकाने सांगितले.’

३. श्री. यश मुगड्याल, धर्मप्रेमी, सोलापूर

श्री. यश मुगड्याल

३ अ. दिंडीसाठी मावळा टोप्‍या अर्पण देणारे सोलापूर येथील श्री. बालाजी चिप्‍पा !

‘२७.५.२०२३ या दिवशी संध्‍याकाळी दिंडीसाठी प्रशिक्षण प्रात्‍यक्षिकांचा सराव चालू होता. त्‍या वेळी श्री. बालाजी चिप्‍पा हे गृहस्‍थ गाडीने जात होते. त्‍यांनी स्‍वतः सरावाच्‍या ठिकाणी येऊन ‘माझे दुकान आहे. दिंडीसाठी तुम्‍हाला कोणत्‍याही प्रकारचे कपडे किंवा साहित्‍य लागले, तर मला सांगा. मी तुम्‍हाला ते देतो’, असे सांगितले. त्‍यांनी २० मावळा टोप्‍या (छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या काळात मावळे वापरत असलेली पागोटेवजा आडव्‍या टोप्‍या) विनामूल्‍य दिल्‍या. अशा प्रकारच्‍या टोप्‍या प्रयत्न करूनही मिळत नव्‍हत्‍या. तेव्‍हा ‘साक्षात् परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी त्‍या धर्मप्रेमींना पाठवले’, असे वाटून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.

३ आ. मला दिंडीच्‍या वेळी पुष्‍कळ आनंद जाणवत होता.

३ इ. सर्वत्र होत असलेला जयघोष आणि भगवे झेंडे पाहून ‘आपण हिंदु राष्‍ट्रातच आहोत’, असे मला वाटले. यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक