भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक ६)
२८ ऑक्टोबर या दिवशी महर्षि वाल्मीकि यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा जीवनपट थोडक्यात जाणून घेऊया.
१. प्रथम संस्कृत काव्यरचना करणारे आदिकवी महर्षि वाल्मीकि !
महर्षि वाल्मीकि तमसा नदीवर स्नानासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत त्यांचा शिष्य भरद्वाज हाही होता. तिथे एका बहरलेल्या वृक्षावर क्रौंच पक्ष्यांचे जोडपे प्रणयाराधन करतांना त्यांना दिसले. काही क्षणांत एक बाण आला आणि त्याने नरपक्ष्याला मृत केले. त्याची मादी आक्रोश करू लागली. करुणामय वाल्मीकि ते पाहून शोकाकुल झाले. पक्ष्यांचा आनंद हिरावून घेणार्या निषादाचा (पारध्याचा) त्यांना राग आला. त्या रागात त्यांनी शापशब्द उच्चारले.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौञ्चमिथुनादेकम् अवधीः काममोहितम् ।।
– वाल्मीकिरामायण, कांड १, सर्ग २, श्लोक १५
अर्थ : हे निषादा (पारध्या) ! तुला नित्य निरंतर शांती कधीही मिळणार नाही; कारण तू या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीमधील कामाने मोहित झालेल्या अशा एकाची, त्याचा काहीही अपराध नसतांना हत्या केली आहेस.
ही शापवाणी काव्यरूप होती. मानवाच्या मुखातून निघालेले ते पहिले काव्य होते. या रचनेने महर्षि वाल्मीकि यांना स्वतःलाही आश्चर्य वाटले. संस्कृत भाषेतील ते आदिकवी ठरले. या प्रसंगाने प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्यासमोर प्रकटले आणि म्हणाले, ‘‘महर्षि, तुमच्या जिव्हेवर जणू सरस्वतीदेवी विराजमान झाली आहे. अशा मधुर काव्यामध्ये तुम्ही रामचरित्राचे वर्णन करा.’’ ब्रह्मदेवांची आज्ञा शिरसावंद्य मानून वाल्मीकींनी रामायण हे महाकाव्य रचले. संस्कृत भाषेतील ते पहिले महाकाव्य ठरले. २४ सहस्र श्लोकांचे हे काव्य भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे उत्तम माध्यम आहे.
२. ‘वाल्या’ झाला ‘महर्षि वाल्मीकि’ !
महर्षि वाल्मीकि यांचे अस्तित्व रामायणातील घटनांशी समकालीन होते, असे दिसून येते. दशरथ राजाशी त्यांचा सलोखा होता. वाल्मीकींच्या चरित्रासंबंधी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात. त्यातल्या त्यात सर्वमान्य अशी कथा पुढीलप्रमाणे आहे.
सुमति नावाच्या ब्राह्मणाने आपल्या पुत्राला शूद्र वंशातील किराताजवळ ठेवले आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. किराताने मुलाचे नाव वाल्या ठेवले. मूळचे जन्मजात संस्कार लोप पावून वाल्या संगतीप्रमाणे अयोग्य वातावरणात वाढला. चोर्या करू लागला. त्याचा विवाह झाला, मुले झाली. लोकांना लुबाडून तो आपल्या कुटुंबाचे पोषण करू लागला. एकदा त्याच्या वाटेत सप्तर्षि आले. त्यांना लुबाडण्यासाठी वाल्याने अरेरावी सुरु केली. सप्तर्षींनी शांतपणे त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली. ‘मी हे पाप माझ्या कुटुंबासाठी करतो’, असे तो म्हणाला; पण जेव्हा त्याला समजले की, आपली बायका-मुले आपल्या पापामुळे मिळणार्या शिक्षेमध्ये वाटेकरी होणार नाहीत, तेव्हा त्याच्या वृत्तीत परिवर्तन झाले. त्याने सप्तर्षींना विचारले, ‘‘आता मी काय करू ?’’ सप्तर्षींनी त्याला विश्वास दिला की, तू तुझ्या पापांपासून मुक्त होऊन सदाचारी बनू शकतोस. ते म्हणाले, ‘‘राम, राम’ असा जप कर.’’
स्वतःतले सत् जागृत करत दीर्घकाळ तप केल्यावर वाल्याच्या संपूर्ण अंगावर वारूळ सिद्ध झाले, तरीही तो देहभान विसरून रामनाम जपत होता. शेवटी तेथे सप्तर्षि आले. त्यांनी त्याला त्याची तपश्चर्या पूर्ण झाल्याचे सांगितले आणि ‘आता तू वाल्मीकी ऋषि झाला आहेस’, असे सांगितले.
३. प्रत्यक्ष रामायणकाळात महर्षि वाल्मीकींनी दिलेले अपूर्व योगदान !
महर्षि वाल्मीकि यांनी तमसा नदीच्या किनारी त्यांचा आश्रम उभारला. त्यांच्या निस्सीम भक्तीमुळेच महाकाव्य रामायण रचण्याचे भाग्य त्यांना मिळाले. रामायण हे श्रीरामाची कथा वर्णन करणारे प्रेरणादायी काव्य आहे. ते नैतिक आदर्शाचे भांडार आहे. वेदोत्तर काळातील समाजजीवन आणि इतिहास यांचे वर्णन करणारा हा महान ग्रंथ आहे. रामाच्या राज्यकारभारामुळे राज्यशास्त्राचेही विवरण त्यात आहे. आदर्श राज्याला ‘रामराज्य’ हा समानअर्थी शब्द रूढ आहे.
महर्षि वाल्मीकि हे रामायणाचे केवळ रचनाकार नव्हते; त्यांची रामायणातही महत्वाची भूमिका होती. लोकहितार्थ रामाने सीतेचा त्याग केल्यावर लक्ष्मणाने तिला वाल्मीकींच्या आश्रमात आणून सोडले. सहृदय पित्याप्रमाणे वाल्मीकींनी सीतेचा सांभाळ केला. रामाचे वंशज त्यांच्याच आश्रमात जन्मले. कुश आणि लव यांचे शिक्षण अन् संस्कार यांमध्ये वाल्मीकींनी जातीने लक्ष घातले. रामाला शोभतील, असे पुत्र त्यांनी घडवले. त्यांना रामायण हे महाकाव्य ऐकवले आणि शिकवले. रामाच्या अश्वमेध यज्ञात कुश-लव यांना घेऊन महर्षि वाल्मीकि उपस्थित होते. सीतेच्या सतीत्वाची ग्वाही देणे, पिता-पुत्रांची भेट घडवून आणणे, राजकुमारांना रामाकडे सोपवणे इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी त्यांनी केल्या. मुलांच्या मनात पित्याबद्दल किंतू न रहाता त्याचे श्रेष्ठत्व टिकून ठेवण्यामध्ये महर्षि वाल्मीकि यशस्वी झाले होते.
४. महर्षि वाल्मीकि यांच्या जीवनचरित्रातून घ्यावयाचा बोध !
वाल्याचा वाल्मीकि झाल्यानंतर पूर्वीचे अयोग्य विचार समूळ नष्ट झालेले दिसून येतात माणूस जन्माने नाही, तर कर्माने लहान किंवा मोठा ठरतो, हे महर्षि वाल्मीकि यांच्या कथेतून लक्षात येते. निश्चयाने आपले कुकर्म टाकून स्वतःत संपूर्ण पालट घडवून महात्मा बनण्याचे मानवातील सामर्थ्य महर्षि वाल्मीकींच्या उदाहरणावरून दिसून येते. वाल्मीकि हे रामायण घडवण्यात एक ऋषि, सहृद व्यक्ती, आचार्य, आदर्श पिता इत्यादी भूमिकांच्या माध्यमातून ते वंदनीय महर्षि आहेत.
– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, मे २००६)