बुद्धीवादी निर्बुद्ध ?

देवाने मनुष्यप्राण्यांना अनमोल अशी बुद्धी दिलेली आहे; मात्र काही अतीशहाणी माणसे म्हणतात, ‘‘मला देवाने बुद्धी दिलेली आहे. मला पाहिजे तसा मी वागेन. तुझ्या विचाराप्रमाणे, बुद्धीप्रमाणे मी का म्हणून वागू ?’’ यासाठीच बुद्धीचे प्रकार आपण समजून घेतले पाहिजेत. तेव्हाच आपल्या लक्षात येईल की, बुद्धीवादी निर्बुद्ध का ? केवळ  व्यावहारिक शिक्षण घेतलेले अडाणी का ? स्वतःला शहाणे समजणारे अतीशहाणे का ?

देवाने सर्व मनुष्यप्राण्यांना जरी बुद्धी दिलेली असली, तरी ती एकसारखी नसते. ती अल्प-अधिक प्रमाणात असू शकते. बुद्धी ३ प्रकारची असते. ‘शुद्ध बुद्धी’ म्हणजे ‘सात्त्विक बुद्धी.’ ‘अशुद्ध बुद्धी’ म्हणजे ‘तामसिक बुद्धी’ आणि तिसरी बुद्धी म्हणजे ‘सद्सद्विवेक बुद्धी’ होय. लहान बाळाची बुद्धी शुद्ध असते, तसेच साधना करून बुद्धी शुद्ध होत जाते, म्हणजे सात्त्विक बुद्धी निर्माण होत असते. जसजसा मनुष्य मोठा होत जातो, तसतशी अशुद्ध किंवा तामसिक बुद्धी निर्माण होत असते. ही बुद्धी घातक असते. अशा प्रकारची बुद्धी असणारा स्वतःचाही नाश करतो आणि इतरांच्याही नाशास कारणीभूत ठरतो.

बुद्धीचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सद्सद्विवेक बुद्धी ! ही बुद्धी ईश्वराच्या किंवा संतांच्या कृपेविना प्राप्त होत नसते. विश्वमन, विश्वबुद्धीशी अनुसंधान साधले गेल्यावर सद्सद्विवेक बुद्धी प्राप्त होत असल्याने ती व्यापक असते. मर्यादित नसते. साधना केल्यानेच ही बुद्धी प्राप्त होते. थेट ईश्वराशी अनुसंधान झाल्याने सद्सद्विवेक बुद्धी असणार्‍याला योग्य-अयोग्य कळते. तोच दुसर्‍याला योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि स्वतःही योग्य मार्गाने पुढे जातो. असेच महापुरुष जगाला योग्य मार्गदर्शन करू शकतात आणि मग तो देश ‘जगद्गुरु’ म्हणून आपोआपच ओळखला जातो.

रावण, दुर्योधन, हिरण्यकश्यपू, नरकासुर ही तामसिक बुद्धी असणार्‍यांची उदाहरणे आहेत. तामसिक बुद्धी असणार्‍यांना ‘असुर’ म्हणून ओळखले जाते. सात्त्विक बुद्धी असणार्‍यांना अहंकार निर्माण झाला की, त्यांची बुद्धी तामसिक बनते; म्हणून सद्सद्विवेक बुद्धीच योग्य बुद्धी आहे, हे आपल्याला लक्षात येते. केवळ व्यावहारिक शिक्षण घेतलेले शिक्षित बुद्धीवाद्यांना केवळ त्यांचेच योग्य वाटत असल्याने त्यांच्या ज्ञानाला मर्यादा येतात आणि ते निर्बुद्ध ठरतात ! विश्वाचे व्यापक ज्ञान लक्षात घेता बुद्धीने योग्य-अयोग्य कळण्यासाठी साधना करण्याला पुष्कळ महत्त्व आहे !

– श्री. श्रीराम खेडेकर,

फोंडा, गोवा.