इस्रायलने सीरियाच्या सैनिकी तळावर केले आक्रमण !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू होऊन आता १९ दिवस झाले आहेत. अशातच इस्रायल सीरियाशीही युद्ध करत आहे. त्याने २४ ऑक्टोबरच्या रात्री सीरियाच्या सैनिकी तळावर आक्रमण केले. इस्रायली संरक्षण दलाने (‘आय.डी.एफ्.’ने) म्हटले की, इस्रायलमधील सीरियाच्या सीमेलगत असलेल्या ‘गोलान हाइट्स’ भागात इस्रायली समुदायावर सीरियाकडून रॉकेट डागण्यात आले. इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल-हमास युद्धबंदीची मागणी केली आहे.

युद्धाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी !

१. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, इंधनाच्या कमतरतेमुळे गाझामधील ६ रुग्णालये बंद पडली आहेत. यांपैकी १ सहस्र लोक ‘डायलिसिस’वर आहेत, तर १३० ‘प्रिमॅच्युअर’ मुले आहेत. परिस्थिती सुधारली नाही, तर अत्यवस्थ रुग्णांना जीव गमवावा लागेल.

२. अरब वृत्तसंस्था ‘अल्-जझीरा’ने दावा केला आहे की, इस्रायलने २४ ऑक्टोबर या दिवशी गाझामधील ‘अल्-अमल’ रुग्णालयावर हवाई आक्रमण केले. तेथे सुमारे ४ सहस्र पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. आक्रमणात किती लोक मारले गेले, याची माहिती समोर आली नसल्याचे ‘अल्-जझीरा’ने म्हटले.

३. आतापर्यंत गाझाला एकूण ५४ ट्रक साहाय्य सामग्री पोचली असली, तरी त्यांत औषधे आणि खाद्यपदार्थच आहेत; परंतु पेट्रोल-डिझेल नाही. या आठवड्यात एकूण २५० ट्रक पोचतील; पण त्यांतही पेट्रोल आणि डिझेल पाठवले जाईल कि नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

४. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले की, २३ आणि २४ ऑक्टोबर या दिवशी गाझामध्ये ४७ हवाई आक्रमणे झाली. यामध्ये ७०४ जणांचा मृत्यू झाला. युद्ध चालू झाल्यापासून एका दिवसात मारल्या गेलेल्या लोकांच्या संदर्भात ही संख्या सर्वांत मोठी आहे. एका दिवसात ४०० ठिकाणांना लक्ष्य केल्याचे स्वत: इस्रायलने मान्य केले, मात्र केवळ ४७ लोक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

ओलीस ठेवलेल्या इस्रायलींची माहिती देणार्‍याला इस्रायली सैन्याकडून संरक्षण देण्याचे वचन !

इस्रायली सैन्याने २४ ऑक्टोबरला गाझामध्ये काही पत्रके टाकली. त्यांमध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या लोकांविषयी सुगावा देणार्‍यांना बक्षीस देण्यासह संरक्षण पुरवण्याचे वचन देण्यात आले आहे. पत्रकात इस्रायली सैन्याचा संपर्क क्रमांक याच्यासह  ‘टेलिग्राम’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘सिग्नल मेसेज’ या सैन्याच्या सामाजिक माध्यमांची माहितीही देण्यात आली आहे.