शरिरात प्रमाणाबाहेर वाढलेले पित्त बाहेर काढून टाकण्यासाठी सोपा उपाय – एरंडेल तेल पिणे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४६

‘पावसाळ्यामध्ये शरिरात पित्ताच्या वाढीसाठी पूरक परिस्थिती निर्माण झालेली असते; परंतु वातावरणात गारवा असल्यामुळे पित्त प्रमाणाबाहेर वाढत नाही. पावसाळा संपल्या संपल्या वातावरणात उष्णता वाढल्यामुळे पित्त प्रमाणाबाहेर वाढते. याला ‘पित्ताचा प्रकोप होणे’, असे म्हणतात. यामुळे डोळे येणे, तोंड येणे, घशात किंवा छातीत जळजळ होणे, हातापायांची आग होणे, गळू होणे, मूत्रमार्गाची, तसेच गुदद्वाराजवळ जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे यांसारखे त्रास होऊ शकतात. शरिरात प्रमाणाबाहेर वाढलेले पित्त काढून टाकले, तर पुढे होणारे हे सर्व त्रास टाळता येऊ शकतात. यासाठी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी चहाचा अर्धा चमचा एरंडेल तेल पिऊन वर अर्धी वाटी कोमट पाणी प्यावे. एरंडेलाचे अर्धा चमचा हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. याने सहसा जुलाब होत नाहीत; परंतु एखाद्याला जुलाब झाल्यास त्याने त्या दिवसापासून एरंडेल तेल पिणे थांबवावे. जुलाब न झाल्यास ७ दिवसांनी एरंडेल तेल पिणे थांबवावे. १० वर्षांखालील मुलांना पाव चमचा एरंडेल तेल द्यावे. ४ वर्षांखालील मुलांना एरंडेल तेल देण्याची आवश्यकता नाही.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका

bit.ly/ayusanatan