आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्व गोष्टी त्वरित हव्या असतात. उदा. मुलांना भूक लागली की, आईचा पदार्थ बनवून होईपर्यंत धीर नाही, मग चटकन सिद्ध होणारा मॅगीसारखा पदार्थ मुलांना हवा असतो. आजचा हा विषय लिहिण्यामागे काही आलेले अनुभव कारणीभूत ठरले. एक महिला रुग्ण चिकित्सालयात आली, तापाची कणकण होती आणि ती औषध घेऊन गेली. ती संध्याकाळी पुन्हा आली आणि म्हणाली, ‘‘औषधाचा काहीच परिणाम झाला नाही.’’ तिला समजावून सांगितले, ‘‘सकाळीच औषध घेतले आहे, तर त्याचा परिणाम दिसायला थोडा वेळ द्यायला हवा’’; परंतु ती महिला रुग्ण ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने मी तिला जाऊ दिले. दुसर्यांदा जेव्हा ती पुन्हा माझ्याकडे आली, तेव्हा आधी तिच्याशी इतर विषयांवर बोलायला प्रारंभ केला. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आले की, ती नोकरी आणि घरातील उत्तरदायित्व असे सगळे सांभाळते. वेळेची कमतरता असल्याने सगळ्या गोष्टी चटकन कशा होतील, याचाच विचार सतत असतो. मग शीतकपाटात आदल्या दिवशी कणिक भिजवून ठेवणे, न्याहरीला ‘रेडीमिक्स’ची पाकिटे (तयार असलेल्या पदार्थांची पाकिटे) असे सर्व वेगवेगळे पर्याय तिने मला सांगितले. ‘एक दिवस मी झोपून राहिले, तर कितीतरी हानी होईल’, अशी भीती तिच्या मनात होती. परिणामी ‘औषधही चटकन काम करणारेच असायला पाहिजे’, असा तिचा अट्टाहास होता.
हे सर्व सांगण्यामागचा उद्देश एवढाच की, ‘इन्स्टंट’ (तात्काळ अथवा झटपट) करण्याच्या नादात ती महिला रुग्ण आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी चुकीच्या गोष्टी आचरणात आणत होती. परिणामी तिच्या आरोग्यावर अधून मधून परिणाम दिसायला लागला. त्यातही औषध घेऊन लगेच बरे वाटले की, पुन्हा त्या चुकीच्या गोष्टी चालूच होत्या. त्यामुळे हे दुष्टचक्र चालूच रहाणार. या उदाहरणातून मला शिकायला मिळाले की, सध्या मनाचा संयम ढासळत चालला आहे. ‘सगळ्या गोष्टी चटकन मिळाल्या पाहिजेत किंवा लगेच व्हायला पाहिजेत’, असे सर्वांना वाटत असते.
१. ‘संयम अल्प आहे’, हे दाखवणारी उदाहरणे
अ. लहान मूल एखादा प्रकल्प करत असल्यास तो लगेच जमला नाही किंवा बिघडला की, ते मूल चिडचिड करते.
आ. बहुतांश लोक पैसा त्वरित आणि मेहनतीखेरीज कसा मिळवता येईल ? याची धडपड करत असतात. परिणामी वाईट मार्गाने पैसा कमवायला लागतात. त्यातूनच पुढे गुन्हेगारी, व्यसने इत्यादींमध्ये अडकतात.
इ. विद्यार्थ्यांमध्ये त्वरित यशस्वी होण्यासाठीची चढाओढ निर्माण होते. एखाद्या विषयात आपण कुशल होण्यासाठी संयमाने आणि काटेकोरपणे प्रयत्न करत राहिले पाहिजे, हे त्यांना पटेनासे होते. यश मिळाले नाही, तर नैराश्य, चिडचिडेपणा असे वाढत जाऊन काही जणांमध्ये पुढे आत्महत्येपर्यंत विचार येतात आणि स्थिती गंभीर होते.
ई. गृहिणींना वेळ नसतो; म्हणून झटपट पदार्थ करण्याकडे त्या अधिक आकर्षित होतात. आजकाल भ्रमणभाषवर एका ‘क्लिक’वर घरपोच पाहिजे, ते पदार्थ त्वरित मिळतात. त्याचे प्रमाणही सध्या पुष्कळ वाढले आहे. पदार्थ पटकन गरम करण्यासाठी ‘मायक्रोवेव्ह’चा वापर करणे, सरबत करण्यासाठी विकत मिळणारे सिरप घेणे, भाजी पटकन होण्यासाठी तयार मसाले वापरणे (ज्याच्यामध्ये ‘प्रिझर्व्हेटीव्ह’चा (पदार्थ खराब होऊ नये; म्हणून वापरण्यात येणारे रसायन) वापर मोठ्या प्रमाणात केलेला असतो), ‘फ्रोझन’ पदार्थ (गोठवून जतन केलेले अन्न) की, जे फक्त शीतकपाटातून काढून सिद्ध करायचे असतात, अशा एक ना अनेक चुका फक्त झटपट पदार्थ करण्याच्या अट्टाहासाने केल्या जातात.
उ. रुग्णांमध्ये असे बघायला मिळते की, डोके पुष्कळ दुखत आहे, तर त्याच्या मुळाशी न जाता पटकन मनानेच वैद्यकीय दुकानामध्ये जाऊन गोळी आणून ती घेणे. (यात सुद्धा मुळाशी जाण्याचा भाग नसतो. ‘वेळ नाही’, ही तक्रार सांगितली जाते.)
ऊ. लहान मूल बारीक असेल, तर तो लगेच गुटगुटीत व्हायला पाहिजे; म्हणून त्यासाठी मुलांवर अनेक प्रयोग केले जातात.
ए. वजन न्यून करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करत असेल, तर ते पटकन न्यून करण्यासाठी चुकीचे पर्याय निवडले जातात. लगेच परिणाम दिसला नाही की, कशाचा उपयोग नाही ? म्हणून निराशा येते.
ऐ. अध्यात्म मार्गातील व्यक्ती असेल, तर साधनेचे थोडेसे प्रयत्न केले की, ‘आपल्याला त्याचे फळ लगेच मिळावे’, अशी मनात अपेक्षा रहाते, तसे झाले नाही, तर लगेच निराशा येते.
ही काही ठराविक उदाहरणे झाली. अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील की, ज्याच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला लक्षात येते की, मनाचा संयम लोप पावत चालला आहे.
२. मनाचा संयम ढासळल्याने उद्भवणारे मनाचे विकार
अ. चिडचिडेपणा
आ. राग येणे
इ. मनाची अस्वस्थता
ई. अतिविचार करणे
उ. अपेक्षा वाढणे
ऊ. निराशा
३. मनाचा संयम वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न
आता मनाचा संयम वाढवण्यासाठी प्रथम आपण स्वतःच्या बुद्धीला काटेकोरपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व पटवून द्यावे लागते. आता जसे मूल जन्माला येण्यासाठी पूर्ण ९ मास वेळ द्यावाच लागतो. बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी निसर्गनियम म्हणून आपण तो कालावधी बुद्धीने समजून घेतलेला असतो. त्यामुळे तिथे आपल्याला संयम ठेवता येतो. आपण मूल लवकर जन्माला यावे, यासाठी काही करत नाही; कारण आपल्याला ज्ञान असते की, अशी घाई केल्याने मुलाची वाढ नीट होणार नाही आणि आपल्याला त्या परिणामांची जाणीव असते.
या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की, एखाद्या गोष्टीचे यथायोग्य ज्ञान स्वतःच्या बुद्धीला झालेले असेल, तर आपल्याकडून तशी योग्य कृती आपोआप होते आणि तिथे आपला संयमही रहातो; कारण बुद्धीला त्या परिणामांची जाणीव झालेली असते, म्हणजे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या त्रिसूत्रांच्या साहाय्याने आपण आपल्या मनाचा संयम वाढवू शकतो. हे आपण उदाहरणांसहित समजून घेऊया, म्हणजे आपल्याला अधिक स्पष्टता येईल.
३ अ. इच्छाशक्तीला क्रियाशक्तीची जोड हवी ! : एखाद्या विद्यार्थ्याला आधुनिक वैद्य व्हायचे, अशी इच्छा झाली. ही झाली त्याची इच्छाशक्ती. आता फक्त इच्छा असून उपयोग नाही, तर आधुनिक वैद्य होण्यासाठी आपण आतापासून कोणते विषय मनापासून शिकले पाहिजेत ? आपल्याला किती वर्षे शिकण्यासाठी द्यायची आहेत ? तेवढी मेहनत घेण्यासाठी स्वतःची शारीरिक क्षमता आहे कि नाही ? तेवढा अभ्यास करण्याची स्वतःच्या मनाची सिद्धता आहे कि नाही ? या संदर्भातील सर्व ज्ञान करवून घेणे क्रमप्राप्त आहे. जेव्हा या सर्व मुद्यांचे आकलन होऊन त्या मुलाच्या बुद्धीला पटले की, ‘हे सर्व आपण करू शकतो’, यानंतर त्याची क्रियाशक्ती महत्त्वाची ठरते, म्हणजेच काय, तर प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात. या सर्वांचा मेळ यथायोग्य झाल्यास यश हे निश्चितच मिळते.
३ आ. बुद्धीने मनाला महत्त्व पटवून दिल्यास संयम रहाणे : स्वतःला होणार्या आजाराविषयीचे उदाहरण बघूया. रुग्णाला स्वतःला आजारातून बरे होण्याची इच्छा असते. तेव्हा स्वतःला झालेल्या आजाराविषयीची पूर्ण माहिती वैद्यांकडून करून घ्यायला हवी, म्हणजेच काय, तर आजाराची गंभीरता, त्यासाठी कोणती काळजी किंवा पथ्य पाळले पाहिजे ? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ? इत्यादी. हे सर्व जाणून घेतल्यावर त्याप्रमाणे काटेकोरपणे प्रयत्न करत राहिल्यास आपल्याला त्यातून सहज बाहेर पडता येते. एखादा आजार बरा होण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा आणि आपण पथ्य अन् काळजी घेतली, तर ‘आजार बरा होणार आहे’, हे बुद्धीला पटवून दिल्यास स्वतःच्या मनाचा संयम टिकून रहातो. याचसमवेत आजार त्वरित बरा करण्याच्या घाईत वैद्यकीय दुकानामध्ये जाऊन मनाने औषध घेण्याऐवजी वैद्यांकडून औषध घ्यायला प्रवृत्त व्हायला हवे.
अशा प्रकारे विविध सुखसोयी आपले जीवन जरी सुखकर करत असले, तरी स्वतःच्या मनाचा संयम राखण्यासाठी कोणत्या आणि किती सुखसोयींचा उपयोग आपण करायचा, याचा विचार करणे, हे स्वतःचे शरीर आणि मन यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२३.१०.२०२३)