सियाचीन येथील सैन्य तळावर वीरमरण आलेले अक्षय लक्ष्मण गावते हे पहिले ‘अग्नीवीर’ !

‘अग्नीवीर’ अक्षय लक्ष्मण गावते

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जगातील सर्वांत उंच सैन्य तळ असलेल्या सियाचीन येथे तैनात भारतीय सैनिक अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण आले. देशासाठी प्राणार्पण करणारे ते पहिले ‘अग्नीवीर’ झाले आहेत. अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

काराकोरम पर्वतरांगेत जवळपास २० सहस्र फूट उंचीवर असलेल्या सियाचीन हिमनदीच्या परिसरात जगातील सर्वांत उंच सैन्य तळ आहे. येथे भारतीय सैनिकांना प्रचंड थंड वातावरणाला तोंड द्यावे लागते. जून मासात आग लागण्याच्या कारणावरून येथील सैन्य तळावर एका सैनिकाचा मृत्यू झाला होता, तर ३ सैनिक घायाळ झाले होते.

काय आहे ‘अग्नीवीर’ योजना ?

‘अग्नीवीर’ ही भारतीय सैन्यात सैनिकांची ४ वर्षांसाठी भरती करण्यासाठीची शासनाची योजना असून यांतर्गत केवळ सैनिकांची नियुक्ती केली जाते. यात सैन्याधिकार्‍यांचा समावेश नसतो. या योजनेच्या अंतर्गत तैनात सैनिकांना ‘अग्नीवीर’ नावाने संबोधित केले जाते.