‘नदी सुधार’ योजना लालफितीमध्ये अडकली !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे)- शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी आणि मुळा या ३ नद्या स्वच्छ अन् सुंदर करण्याची ‘नदी सुधार’ योजना लालफितीमध्ये अडकून पडली आहे. पाठपुरावा करूनही राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याकडून सुधारित नियमान्वये अंतिम संमती मिळाली नसल्याने हे तीनही प्रकल्प रखडले आहेत. अहमदाबाद येथील कर्णावती नदीच्या धर्तीवर या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

त्यासाठी पवना नदीच्या २४.४० किलोमीटर अंतराच्या दोन्ही बाजूंच्या काठावर काम केले जाणार असून त्यासाठी ५५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इंद्रायणी नदीच्या एका बाजूचे १८.८० किलोमीटर अंतर असून त्यासाठी १ सहस्र २२० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे, तर मुळा नदीच्या १४.४० किलोमीटर अंतराच्या एका बाजूचे काम करण्यासाठी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल ‘बाँड’ही (महापालिकेतील रोखे योजना) काढले आहेत; मात्र सरकारची संमती मिळत नसल्याने महापालिकेला काम चालू करता येत नाही. शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन उघड्या नाल्याला जोडल्या आहेत, तसेच हे पाणी नदीपात्रात सोडल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून वहाणार्‍या या तीनही नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र जलपर्णींनी व्यापलेले असते. या नद्यांपैकी इंद्रायणी नदी प्रकल्पाचा समावेश ‘अमृत योजने’त मध्ये करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमती दिली आहे; मात्र या प्रकल्पाच्या आराखड्यास पर्यावरण विभागाच्या नव्या नियमावली अन्वये अद्याप संमती मिळालेली नसल्याने प्रकल्प रखडला आहे.

संपादकीय भूमिका :

कारखान्यांमुळे होणार्‍या नदी प्रदूषणाच्या संदर्भात पर्यावरणवादी आता गप्प का ? हिंदूंच्या सणांच्या वेळी नदी प्रदूषणाचे सूत्र डोक्यावर घेणार्‍या या (ढोंगी) पर्यावरणवाद्यांना कारखान्यांमुळे होणारे नदीचे प्रदूषण दिसत नाही का ?