योगी आदित्यनाथ यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेश पोलिसांच्या चकमकीत १९० गुन्हेगार ठार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली माहिती !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे. या चकमकींमध्ये ५ सहस्र ५९१ गुन्हेगार आणि १ सहस्र ४७८ पोलीस घायाळ झाले, तसेच १६ पोलिसांनाही वीरमरण प्राप्त झाले, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ते येथील पोलीस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

उत्तरप्रदेश राज्यात झालेल्या चकमकींमध्ये कुख्यात गुंड विकास दुबे याची चकमक सर्वाधिक चर्चेचा विषय बनली होती. अतिक अहमदचा मुलगा असद अहमद यालाही पोलिसांनी चकमकीत मारले होते. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या कह्यात असतांना आक्रमणकर्त्यांच्या आक्रमणात मारले गेले होते.