पेशावरमध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांनी माझ्यावर खिळा फेकला होता ! – इरफान पठाण, माजी भारतीय क्रिकेटपटू

पुणे – भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी पाकिस्तानी क्रिकेट  चाहत्यांविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘पाकिस्तानमधील पेशावर येथे खेळतांना पाकिस्तानी प्रेक्षकांनी माझ्यावर खिळा फेकला होता. हा खिळा माझ्या डोळ्याखाली लागला होता’, असे त्यांनी सांगितले. १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पुण्यात झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात समालोचन करतांना पठाण यांनी हा खुलासा केला. या वेळी पठाण म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारतीय प्रेक्षकांची तक्रार करण्यापूर्वी स्वत:च्या वागणुकीकडे लक्ष द्यावे. (पाकिस्तानचे हे वागणे म्हणजे, ‘स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही; मात्र इतरांच्या डोळ्यांतील कुसळ दिसते’ या म्हणीचे प्रत्यय आणून देणारे आहे ! – संपादक)  

भारताने एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत १४ ऑक्टोबर या दिवशी कर्णावतीच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला गेला. त्या वेळी भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार प्रविष्ट केली होती. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असतांना काही प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या  घोेषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘या घोषणा खेळाडूंच्या भावना दुखावणार्‍या होत्या’, असे त्यात म्हटले होते.

संपादकीय भूमिका

भारतीय प्रेक्षकांना दूषणे देणार्‍या पाकने आणि भारतातील पाकप्रेमींनी याविषयी बोलावे !