गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रारंभ 

क्रीडा स्पर्धेची संधी घेऊन खेळाडूंनी त्यांचे क्रीडा कौशल्य विकसित करावे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे आणि इतर मान्यवर

पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) : बहुप्रतिक्षित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला १९ ऑक्टोबर या दिवशी  ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानात बॅडमिंटन खेळाने औपचारिकरित्या प्रारंभ झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.

या वेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन २६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही क्रीडा स्पर्धा ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘क्रीडा स्पर्धेची संधी घेऊन खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे. क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे स्वप्न आम्ही गेल्या १० वर्षांपासून पहात होतो आणि त्यासाठी पुष्कळ मेहनत घ्यावी लागली. आता स्पर्धेला प्रारंभ होत असल्याने आनंद होत आहे. खेळाडूंनी आगामी आशिया स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम आणि ऑलिंपिक खेळ यांमध्ये चांगली कामगिरी बजावण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा चांगला लाभ करून घेतला पाहिजे.’’ ३७ व्या क्रीडा स्पर्धेमध्ये ४३ क्रीडा प्रकार होणार आहेत. यापूर्वी ३६ वी क्रीडा स्पर्धा गुजरात येथे झाली होती आणि त्यामध्ये ३६ क्रीडा प्रकार होते. केरळमध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत ३३ क्रीडा प्रकार होते.

क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश

भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गोमंतकातील युवकांसाठी विशेष संदेश देतांना म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या उद्घाटन सोहळ्याला १२ सहस्र प्रेक्षक उपस्थित रहाणार ! – क्रीडामंत्री गोविंद गावडे

याप्रसंगी क्रीडामंत्री गोविंद गावडे पत्रकारांना म्हणाले, ‘‘फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू मैदानात २६ ऑक्टोबर या दिवशी होणारा ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १२ सहस्रांहून अधिक प्रेक्षक पहाणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात निम्मी जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असेल आणि विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी २५० ‘बालरथ’ बसगाड्यांची सोय केली जाणार आहे. सर्वसाधारण प्रेक्षक, अतीमहनीय व्यक्ती आणि खेळाडू या सर्वांसाठी मैदानात निरनिराळी जागा आरक्षित  असेल. विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री या क्रीडा स्पर्धा पहाण्यासाठी येणार आहेत आणि त्यांची विविध पदक प्रदान सोहळ्यांसाठी प्रमुख पाहुणे या नात्याने नियुक्ती केली जाणार आहे.’’