केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे वक्तव्य !
नवी देहली – आपण सर्व राष्ट्रपिता म. गांधी यांचे अनुयायी आहोत. राष्ट्राच्या उभारणीत आणि उच्चभ्रू वर्गाची चळवळ देशातील जनतेपर्यंत पोचवण्यातील त्यांची भूमिका मोठी आहे; परंतु मी सांगू इच्छितो की, म. गांधी ही अतिशय गुंतागुंतीची व्यक्ती होती. ब्रिटनमध्ये असतांना ते पहिल्या महायुद्धात ब्रिटनला साहाय्य करण्यासाठी भारतियांना पाठवण्याच्या संदर्भात बोलले होते, असे विधान केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी येथे केले. पत्रकार आणि प्रसार भारती बोर्डाचे सदस्य अशोक टंडन यांच्या ‘द रिव्हर्स स्विंग – कॉलोनिअलिझम् टू कोऑपरेशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी या पुस्तकातील ‘महात्मा गांधी – ब्रिटनसाठी शांततेचा दूत’ या प्रकरणाचा संदर्भ देत ते बोलत होते.
पुरी पुढे म्हणाले की, ब्रिटनमधील म. गांधी यांचे प्रारंभीचे जीवन आणि त्यांच्या शिक्षणाने त्यांना इंग्रजी शैलीतील अधिवक्ता बनण्यास सिद्ध केले. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर ते आपल्या ओळखीचे आणि राष्ट्रीय चळवळीत योगदान देणारे गांधी बनू लागले.
ब्रिटनने कधीच जालियानवाला बागेवर क्षमा मागितलेली नाही !
पुस्तकाचे लेखक अशोक टंडन यांनी जालियनवाला बागेवर लिहिलेल्या एका प्रकरणाचा संदर्भ देतांना पुरी यांनी सांगितले की, ब्रिटनच्या राणीपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे; परंतु आजपर्यंत या घटनेसाठी अधिकृत क्षमा मागितलेली नाही.
संपादकीय भूमिका
|