मुंबईतील टोलनाक्यांवर ७० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा !

महाराष्ट्रात १३५ टोलनाके

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई


मुंबई, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत. यामध्ये मुंबईतील टोलनाक्यांवर प्रतीवर्षी ७० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा होतो. या खालोखाल ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मार्गावरील टोलनाक्यांवर वर्षाला ६० कोटी रुपयांहून अधिक, तर किणी-तासवडे मार्गावरील टोलनाक्यांवर ६० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा होतो. प्रतीवर्षी ३ कोटी रुपयांहून अधिक टोल प्राप्त होणार्‍या टोलनाक्यांचा समावेश ‘अ’ श्रेणीत होतो. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या १८ टोलनाक्यांवर प्रतीवर्षी १ ते ३ कोटी रुपयांचा टोल जमा होतो, तर १४ टोलनाक्यांवर १ कोटी रुपयांहून अल्प टोल जमा होतो.

१. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे ५० आणि राष्ट्रीय महामार्गावरील ७१ असे एकूण १३५ टोलनाके आहेत. यांमधील केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १४, तर रस्ते विकास महामंडळाच्या १५ अशा २९ टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना (जीप, कार) टोलमाफ आहे, तर उर्वरित १०६ टोलनाक्यांवर सरसकट सर्वांकडून टोल घेतला जातो.

२. भारतातातील राष्ट्रीय महामार्गांवर एकूण ९३५ टोलनाके आहेत. त्यांतील ७१ टोलनाके महाराष्ट्रात आहेत. राष्ट्रीय टोलनाक्यांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक ११२ टोलनाके आहेत. त्या खालोखाल मध्यप्रदेश ९०, तमिळनाडू ६०, बंगाल २८, पंजाब ३३, तर नवी देहली येथे १० टोलनाके आहेत. या व्यतिरिक्त त्या राज्यातील स्थानिक प्राधिकरणाचे टोलनाके आहेत.