नामकरण संस्कार

नामकरण विधी

१. नामकरण विधी कसा करावा ?

‘प्रसिद्ध धर्मशास्त्र ‘मनुस्मृति’मध्ये मनु महाराज म्हणतात,

आयुर्वयोऽभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा।
नामकर्मफलं त्वतेत् समुद्दिष्टं मनीषिभिः।।

अर्थ : नामकरण संस्कारामुळे आयुष्य आणि तेज यांची वृद्धी होते, तसेच लौकिक व्यवहाराची सिद्धी होते, असे विद्वानांनी सांगितले आहे.

‘बाळाचा जन्म होऊन १० दिवस झाल्यानंतर ११ व्या दिवशी किंवा १०० व्या दिवशी किंवा १ वर्षानंतर बाळाचे नाव ठेवण्यासाठी ‘नामकरण संस्कार’ समारंभ केला पाहिजे’, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी आपले गुरुजन, पुरोहित आणि स्वतःचे नातेवाइक यांना निमंत्रित करून हा नामकरण संस्कार करण्याचा समारंभ साजरा केला पाहिजे. या अंतर्गत घराची शुद्धी आणि स्वच्छता करून बाळाच्या आईवडिलांनी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार देवतांचे पूजन करावे. काशाच्या ताटात तांदुळ पसरून त्यावर ऐपतीनुसार सोन्याच्या काडीने बाळाचे नाव लिहावे. ब्राह्मणाने बाळाच्या नावाचा उच्चार त्याच्या कानाजवळ करून त्याला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद द्यावा.

२. नाव कसे असायला पाहिजे ?

याविषयी एक श्लोक ‘पारस्कर गृह्यसूत्र’ या ग्रंथात दिला आहे. तो असा,

द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यन्तरन्तस्थं दीघार्भिनिष्ठानान्तं कृतं कुर्यान्न तद्धितम्।
अयुजाक्षरमाकारान्तं स्त्रियै तद्धितम्।
शर्म ब्राह्मणस्य वर्म क्षत्रियस्य गुप्तेति वैश्यस्य। – पारस्कर गृह्यसूत्र, कारिका १, कण्डिका १७, सूत्र २ ते ४

अर्थ : बालकाचे नाव २ किंवा ४ अक्षरी असावे. त्याच्या आरंभी घोष वर्ण (ग घ ङ, ज झ ञ, ड ढ ण, द ध न, ब भ म, य र ल व ह आणि सर्व स्वर) यांपैकी कोणतेही एक अक्षर असले पाहिजे. नावाच्या अंती दीर्घ वर्ण असावा, ते तद्धित (शब्दांना वत्, इन् आदी वेगवेगळे प्रत्यय लावलेले) नसावे. स्त्रियांचे नाव विषम अक्षरांचे आणि आकारान्त असावे. ब्राह्मण बालकाचे नाव शर्मा, क्षत्रिय बालकाचे नाव वर्मा आणि वैश्य बालकाचे नाव गुप्त या शब्दांनी युक्त असावे.

वरील श्लोकावरून समजते की, बालकाचे नाव उच्चार करण्यास सोपे असावे, घोष आणि अक्षरे यांचा उच्चार तुलनेत सोपा असतो. यानुसार नाव न ठेवल्याचा अर्थ हा आहे की, बालकाचे नाव धातुपासून विकृत करून बनलेले नसावे, उदा. दयापासून दयाळू, कृपापासून कृपाळू इत्यादी. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे नाव कोमल ध्वनीयुक्त असावे. त्याच समवेतच स्त्रियांचे नाव नदी, पर्वत, वन किंवा भयंकर जीव-जंतूंवरून नसावे. याचे कारण असे आहे की, नदी किंवा नक्षत्र यांची स्थिती क्षणोक्षणी पालटत रहाते. पर्वत किंवा वृक्ष आदी कठोर आणि अचल असतात, तर भयंकर जीव-जंतूंवर आधारित नाव ऐकायलाही चांगले वाटत नाहीत अन् ते नाव उत्तम गुणयुक्तही नसते.

३. नावाचे महत्त्व

नावाचे महत्त्व समजूनच गुरु बृहस्पति यांनी म्हटले आहे,

नामखिलस्य व्यवहारहेतुः शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:।
नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्यस्ततः प्रशस्तं खलु नामकर्म।।

अर्थ : नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे.’

(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, ऑक्टोबर २००४)