गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या आगमनाला प्रारंभ

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) : २६ ऑक्टोबरपासून गोव्यात होणार्‍या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी त्यात सहभागी होणार्‍या खेळाडूंचे गोव्यात आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. १७ ऑक्टोबरला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दाबोली विमानतळावर काही खेळाडूंचे स्वागत केले.

यासंबंधी ते म्हणाले,

‘‘आज विमानाद्वारे आणि रेल्वेद्वारे मिळून १५६ खेळाडू गोव्यात आले आहेत. त्यांचे कला आणि संस्कृती खात्याकडून ढोलताशांच्या गजरात फुले देऊन स्वागत केले गेले. याव्यतिरिक्त महनीय व्यक्ती, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक इत्यादी गोव्यात येणार आहेत. १९ ऑक्टोबरपासून बॅडमिंटन या खेळाच्या स्पर्धेला ताळगाव येथील श्यामाप्रसाद स्टेडियमवर प्रारंभ होणार असून त्यानंतर फेन्सिंग आणि व्हॉलीबॉल स्पर्धा चालू होतील. ‘गोव्यात येणार्‍या या खेळाडूंचे ‘अतिथी देवो भव’ या भावाने गोव्यातील लोकांनी स्वागत करावे’, अशी मी लोकांना विनंती करतो. आदरातिथ्य हे गोव्याचे मुख्य ब्रीद आहे.

२६ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या उद्घाटनाच्या समारंभासाठी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम २३ ऑक्टोबरपर्यंत सिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत. स्टेडियमसंबंधी अंतिम सिद्धता पूर्ण करण्यासाठी आम्ही २ दिवसांचा कालावधी ठेवला आहे. कांपाल येथील क्रीडा नगरीचे काम २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. आम्ही स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम खाते इत्यादी खात्यांना ‘२५ ऑक्टोबरपासून रस्ते खणावे लागतील अशी कामे स्थगित ठेवावीत’, अशी सूचना दिली आहे.’’