लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत मलबद्धतेची तक्रार बर्याच प्रमाणात दिसून येते. त्यावर मनानेच घरी पुष्कळ वेगवेगळी औषधे घेऊन उपचार केले जातात. एक-दोनदा त्याचा लाभ होतो; परंतु नंतर ही समस्या पुन्हा पुन्हा भेडसावतच असते. बरेच रुग्ण असे दिसून येतात की, सकाळी चहा, कॉफी घेतल्याविना पोट साफ होत नाही; गरम पाणी प्यायल्याविना पोट साफ होत नाही. याहीपेक्षा वाईट स्थिती म्हणजे सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे अथवा मशेरी लावल्याविना काही जणांना मलप्रवृत्तीची संवेदना येत नाही. हे सर्वच प्रकार स्वतःच्या आरोग्याची स्थिती ढळल्याचे लक्षण आहे. आपण ‘पुष्कळ, काहीही आणि कितीही खा अन् रात्री एक गोळी घेतली की, सकाळी पोट साफ’, अशा प्रकारच्या विज्ञापनांना भुलतो. ‘प्रारंभीला एका गोळीने पोट साफ होते; परंतु नंतर दोन गोळ्या घेऊनही रुग्णाचे पोट साफ होत नाही’, असे प्रत्यक्षात दिसून येते. अशा गोळ्यांची सवय ज्यांना लागली आहे, त्यांनी वेळीच आपल्या दिनचर्येत पालट करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे. आजच्या लेखामध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
१. मलबद्धता होण्यामागील कारणे
सर्वप्रथम आपल्याला मलबद्धता का होत आहे ? या कारणांचा शोध घेतला पाहिजे; कारण मलबद्धत्तेला कारणीभूत घटक आपण दूर केले नाहीत, तर कितीही औषधे घेतली, तरी त्याचा आपल्याला कायमस्वरूपी लाभ होणार नाही.
अ. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे विरुद्ध अन्नाचे सेवन करणे अन् आधीचे अन्न पचण्यापूर्वी पुन्हा वरचेवर खात रहाणे. विरुद्ध अन्न म्हणजे काय ? तर दूध आणि फळे एकत्र खाणे, बिर्याणीसारखे पदार्थ ज्यामध्ये मांसाहाराला दही लावून नंतर तेल घालून परतले जाते; पनीरच्या मसालेदार भाज्या, ज्यामध्ये पनीर दूध नासवून सिद्ध केलेले हे सर्व विरुद्ध अन्न होय. वरचेवर खाणे म्हणजे काय ? तर भूक नसतांना एखादा पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
आ. आंबवलेले पदार्थ आणि पचायला जड पदार्थ अतीप्रमाणात खाणे. बेकरीचे पदार्थ, इडली, डोसा, तेलकट पदार्थ, चीज, पनीर यांसारखे पदार्थ, तसेच मांसाहार हे सुद्धा पचायला जड आहेत. असे पदार्थ अतीप्रमाणात खाल्ल्यास मलबद्धता निर्माण होते.
इ. रात्री जागरण करणे, हे मलबद्धता निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे कारण आहे. लवकर झोपून सकाळी लवकर उठल्यास पोट साफ होण्यास साहाय्य होते.
ई. जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास घेतलेल्या आहाराचे नीट पचन होत नाही. तेव्हा जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
उ. क्षमतेपेक्षा पुष्कळ व्यायाम करणे अथवा अजिबात व्यायाम न करणे, हेसुद्धा मलबद्धता निर्माण होण्यासाठी कारणीभूत घटक आहे. व्यायाम न केल्यामुळे शरिराची हालचाल होत नाही, परिणामी जठराग्नी प्रदीप्त होत नाही आणि पोट साफ न होण्याची तक्रार निर्माण होते.
ऊ. आपले शरीर आपल्याला विविध संवेदनांच्या माध्यमातून स्वतःला जाणीव करून देत असते की, मल कोणत्या वेळेत बाहेर पडला पाहिजे. सकाळी शाळा, महाविद्यालय, कार्यालय इत्यादींमध्ये जाण्याची घाई असते. अशा घाईगडबडीत आपण आपल्या शरिराच्या संवेदनांकडे दुर्लक्ष करतो आणि परिणामी पोट साफ होत नाही.
२. पोट साफ न झाल्यास दिसणारी लक्षणे
पोट साफ न झाल्यास आपल्याला पुढील लक्षणे दिसून येतात.
अ. भूक मंदावणे.
आ. मलप्रवृत्तीच्या वेळी जोर द्यावा लागणे.
इ. अपचन, आंबट ढेकरा, मळमळ, पोटात दुखणे, पोट जड असणे.
ई. छातीत जळजळणे, डोके दुखणे, झोप न येणे.
उ. उत्साह न्यून होणे, स्वभाव त्रासिक आणि चिडचिडा होणे, अशी लक्षणे शरिरात निर्माण होतात.
मलबद्धतेच्या त्रासावर वेळीच उपचार न केल्यास निद्रानाश, डोकेदुखी, मूळव्याध असे त्रास पुढे उद्भवतात.
३. मलबद्धता दूर करण्यासाठी दिनचर्येत करावयाचे पालट
आता यावर कोणते उपाय करू शकतो, ते येथे देत आहे –
अ. कडकडीत भूक लागल्यावर प्रमाणात जेवावे. दोन घास कमीच खावे. अगदी पोटाला तडस लागेपर्यंत (पोट गच्च भरेपर्यंत) जेवू नये. आपल्या शरिराच्या संवेदनांकडे लक्ष द्यावे. केवळ जेवणाची वेळ झाली; म्हणून जेवायला बसलो, हे अयोग्य आहे. खरच आपल्याला भूक आहे का ? हे पाहून मगच आहार घ्यावा. तसेच आपले पोट भरेल तेव्हा थांबावे.
आ. बैठे काम असणार्यांनी स्वतःला व्यायामाचा नियम घालावा. यामध्ये योगासनांचा पुष्कळ चांगला लाभ होतो. पश्चिमोत्तनासान, वज्रासन, मलासन, पवनमुक्तासन ही आसने नियमित करावीत.
इ. आहारात आठवड्यातून किमान एक वेळ पालेभाजी असावी; पण पालेभाज्या खातांना त्या शिजवूनच खाव्यात. जेवणात एखादी कोशिंबीर असायला हवी; पण अधिक प्रमाणात कोशिंबीर घेऊ नये. एक वेळच्या जेवणात भाकरीचा समावेश करावा. फळांमध्ये पपई, द्राक्ष, अंजीर, मनुका यांचा समावेश करावा.
ई. रात्रीचे जागरण पूर्णपणे बंद करून सकाळी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. दुपारी झोपू नये. वयस्कर व्यक्तींना विश्रांती घ्यायची झाल्यास ती १५ ते २० मिनिटे डाव्या कुशीवर झोपून घ्यावी. लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती सोडल्यास इतरांनी दुपारी झोपू नये. रात्रीची झोप पूर्ण झाल्यास दुपारी झोपण्याची आवश्यकता नसते.
उ. उकळून गार केलेले पाणी प्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कोमट पाणीच प्यावे. जेवणाच्या पूर्वी किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नये. जेवणाच्या मध्ये थोडे थोडे पाणी पिण्यास हरकत नाही.
ऊ. दही खाऊ नये. त्याऐवजी ताक किंवा कढी चालू शकते.
४. मलबद्धतेच्या त्रासावर करावयाचे उपाय
ज्यांना मलबद्धतेचा त्रास वारंवार होतो, त्यांनी आधी आपल्या दिनचर्येत पालट करायला हवा. हे पालट केल्यानंतरही मलबद्धतेचा त्रास होत असेल, तरच पुढील साधे उपाय करून बघावेत.
अ. सकाळी अनशापोटी १२ ते १५ काळ्या मनुका चावून खाव्यात.
आ. शरिरात पुष्कळ उष्णता आणि मलबद्धता असल्यास अर्धा ते १ चमचा तुळशीचे बी अर्धा पेला पाण्यात भिजत घालून ते खावे.
इ. रात्री झोपतांना अर्धा कप गरम दुधात २ चमचे तूप घालून प्यावे.
ई. ‘सत् इसाबगोल’ नावाची पावडर बाजारात सहज उपलब्ध होते. एक चमचा पावडर वाटीभर पाण्यात घालून प्यावी.
उ. बाजारात मिळणारी पोट साफ होण्याची औषधे आठवड्यातून एकदा त्रास झाल्यास घेण्यात हरकत नसते; परंतु अशा औषधांची सवय लागली असेल, तर मात्र वैद्यांच्या सल्ल्याने औषध उपचार करून घ्यावेत.
ऊ. ज्यांना अशा औषधांची सवय लागली आहे, तसेच मलबद्धतेचा त्रास पुष्कळ जुना आहे, अशांसाठी पंचकर्मातील बस्तीचा चांगला उपयोग होतो.
हे सर्व उपचार करण्यासह वेळोवेळी वैद्यांचा सल्ला घेतल्यास लाभदायी ठरेल.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१७.१०.२०२३)