१. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ
‘श्री. मोरेकाका जून १९९६ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. संस्थेच्या सत्संगात येण्यापूर्वी त्यांची श्रीकृष्णावर भक्ती होती. ते पूजा-पाठ, उपवास इत्यादी सातत्याने करायचे. सत्संगाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी सत्संगात सांगितल्याप्रमाणे साधनेला आरंभ केला. काही कालावधीनंतर ते स्वतः सत्संग घेऊ लागले, तसेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष लावण्याची सेवा करू लागले.
२. नोकरी आणि व्यवसाय
ते देवरुख येथील एस्.टी. डेपोत वरिष्ठ लिपीक (हेड क्लार्क) म्हणून नोकरी करत होते. सेवानिवृत्तीनंतर वर्ष २०२२ पर्यंत त्यांनी ‘विमा प्रतिनिधी’ म्हणून त्यांचा आधीपासून चालू असलेला व्यवसाय केला.
३. सेवेची तळमळ
३ अ. प्रत्येक सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी नीटनेटकेपणाने आणि परिपूर्ण करणे : नोकरी करतांना आणि विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय करत असतांनाही ते ‘विज्ञापने मिळवणे, अर्पण गोळा करणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे इत्यादी, तसेच गुरुपौर्णिमेच्या सेवाही करत होते. जून २०२१ पासून ते दैनिकाच्या संदर्भातील सेवा करत होते.
त्यांना मिळालेली प्रत्येक सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने ते ती नीटनेटकेपणाने आणि परिपूर्ण करायचे. ते रात्री जागूनही ती सेवा पूर्ण करायचेे. ते नेहमी सेवेशी संबंधित आढावे वेळेवर द्यायचे आणि सत्संगालाही वेळेवर उपस्थित रहायचे. सेवेसाठी बाहेर निघतांना ते ठरलेल्या वेळेतच निघायचे. सेवेच्या संदर्भातील नोंदी ते नीटनेटकेपणाने करायचे.
३ आ. त्यांना एखादी सेवा सांगितली, तर ती नीट लक्षात येईपर्यंत ते विविध प्रश्न विचारून त्या सेवेची व्याप्ती समजून घ्यायचे.
४. आजारपणात जाणवलेली सूत्रे
एप्रिल २०२२ मध्ये त्यांच्या मेंदूचे अत्यंत क्लिष्ट शस्त्रकर्म झाले; परिणामस्वरूप त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यामुळे त्यांच्या वाचेवर परिणाम झाला अन् शरिराच्या अर्ध्या भागाच्या हालचालींवर मर्यादा आल्या.
४ अ. सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असणे : शस्त्रकर्मानंतर बिघडलेल्या शारीरिक स्थितीतही ते गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून मनातल्या मनात त्यांच्याशी बोलतात. ते प्रार्थना आणि नामजपही करतात. त्यामुळे या स्थितीतही ते आनंदी दिसतात.
४ आ. ते पत्नीला ‘ऑनलाईन’ उपाय सत्संग आणि नामजप सत्संग यांची नियमित आठवण करून देतात अन् स्वतःही आध्यात्मिक स्तरावरील उपायांना बसतात.
४ इ. शारीरिक त्रासातही सेवेला प्राधान्य देणे : मेंदूचे शस्त्रकर्म होण्याआधी त्यांना ७ – ८ मास डोकेदुखीचा त्रास चालू झाला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी त्यांना अधिक दगदग न करण्याचा सल्ला दिला होता, तरीही ते त्या दुखण्याचा बाऊ न करता जमेल तशी सेवा करायचे.
‘बिकट शारीरिक स्थितीतही श्री. मोरेकाका ज्या श्रद्धेने गुरुचरणांशी जोडून राहिले आहेत, तशी श्रद्धा आमच्याही मनात निर्माण होऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सौ. नेहा विनय पानवळकर, देवरुख, जिल्हा रत्नागिरी. (२९.८.२०२३)