इस्रायल गाझामधील लाखो लोकांना बेघर करून अत्याचार करत असल्याचा ओवैसी यांचा कांगावा !

भाग्यनगर (तेलंगाणा) – इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष चालू असून इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्याने २४ घंट्यांची मुदतही दिली होती. यावर एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना पोटशूळ उठला आहे. ते म्हणाले की, २१ लाख लोकसंख्या असलेल्या गाझा शहरातील १० लाख लोक बेघर झाले आहेत. इस्रायल त्यांच्यावर अत्याचार करत आहे.

सौजन्य एएनआय न्यूज 

ओवैसी पुढे म्हणाले की, हे सर्व होऊनही पूर्ण जग शांत आहे. जगात भयाण शांतता आहे. गाझातील लोकांनी काय केले होते ? त्यांना का मारले जात आहे ? इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाचे इस्रायलच्या बाजूने एकांगी वृत्तांकन करण्यात येत आहे.

आतापर्यंत हमासने केलेल्या आक्रमणात १ सहस्र ३०० हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला असून इस्रायलने केलेल्या प्रतिआक्रमणात पॅलेस्टाईनचे २ सहस्रांहून अधिक लोक ठार झाले आहेत. या सगळ्यातच भारतासमवेत अनेक पश्‍चिमी देशांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन येथील त्यांच्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यास प्रयत्न चालू केले आहेत.

इस्रायल ७० वर्षांपासून पॅलेस्टाईनची भूमी कह्यात घेऊन आहे ! – ओवैसी

भारताची काश्मिरातील भूमी पाक आणि चीन यांनी कह्यात घेतली आहे. यावर कधी ओवैसी का बोलत नाहीत ? कि हे त्यांच्या मनासारखे आहे, असे भारतियांनी समजावे ?

ओवैसी म्हणाले की, इस्रायलने ७० वर्षांपासून पॅलेस्टाईनची भूमी कह्यात ठेवली आहे. हे सर्व कुणाला दिसत नाही. इस्रायलचा अत्याचार कुणाला दिसत नाही का ? (भारतातील जिहादी आतंकवादी भारतातील बहुसंख्यांक हिंदूंवर, तसेच पाक आणि बांगलादेश येथील धर्मांध मुसलमान तेथील अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार करतात. हे ओवैसी यांना दिसत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • ३२ वर्षांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांच्या भयामुळे साडेसात लाख काश्मिरी हिंदू त्यांच्याच देशात विस्थापित झाले. याविषयी ओवैसी महाशयांनी कधी भाष्य का केले नाही ? भारतातील जिहादी आतंकवादाच्या विरोधात ओवैसी तोंड उघडण्यास का घाबरतात ?
  • हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या अमानुष विद्ध्वंसावर ओवैसी का बोलत नाहीत ? उलट इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतरित होण्यास सांगितले आहे, हमासने तर सर्वसाधारण इस्रायलींवर अनन्वित अत्याचार केले. यावर गप्प रहाणे ओवैसी यांना लांच्छनास्पद !