१५ ऑक्टोबर २०२३ या दिवसापासून ‘आश्विन मास’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
‘शारदीय नवरात्र, शस्त्रपूजन (दसरा), लक्ष्मीपूजन (दिवाळी) इत्यादी सण बघता आश्विन मास हा खर्या अर्थाने ‘देवी उपासनेचा मास’ समजला जातो. देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना होय. देवी म्हणजेच जगन्माता होय. गणेशाचा उपासक गाणपत्य, विष्णु उपासक शैव, शक्ती (देवी) उपासक – शाक्त होय. शक्ती उपासनेविना साधनेला पूर्णत्व नाही. देवताही शक्तीच्या अधीन असतात. आपला देहही देवरूप आहे. त्यात प्राणीशक्ती निवास करून असते. या प्राणीशक्तीने देहाची साथ सोडली की, देवरूप असणार्या शरिराला मूल्य रहात नाही, शरीर प्रेत होते. शरिराचे दैवत्व संपुष्टात येते. शक्तीचा निवास नसणार्या शरिराला लवकरात लवकर पंचमहाभूतांच्या स्वाधीन केले जाते. सारांश शक्तीविना संपूर्ण जगत् शन्यू आहे. अशा शक्ती उपासनेचा मुख्य काळ ‘आश्विन मास’ होय.
१. शारदीय नवरात्र
आपल्या कुलस्वामिनीची उपासना आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र महोत्सवाच्या रूपाने संपन्न केले जाते. देवी उपासनेविना राहूच नये; कारण हे व्रत नित्य आणि काम्यही आहे. हे व्रत न केल्यास साधनेत अपूर्णता दोष सांगितला आहे. हे व्रत पार पाडल्यास पूर्णफलप्राप्ती सांगितली आहे. या नवरात्र उपासनेत संकल्प, व्रतोपवास, घटस्थापना, माला बंधन, नित्यपूजन, सप्तशती पाठ, अखंड दीप, हवन, कुमारिका पूजन, बटू पूजन, सुहासिनी पूजन, महोत्सव सांगतेच्या निमित्ताने कुलधर्म, कुलाचार या कर्मांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
१ अ. संकल्प : आश्विन शुद्ध प्रतिपदेस स्नानादिक नित्यकर्म आटोपून देवीच्या नवरात्राचा संकल्प करावा. ‘संकल्पात् सिद्धिः ।’, म्हणजे ‘संकल्प केला की, ते कार्य अवश्य सिद्धीस जाते.’ अर्थात् सर्व मनोकामनांची पूर्ती संकल्पाद्वारे होत असते. म्हणून कुटुंब कल्याण आणि अखंड कृपाप्रसाद प्राप्ती यांचा संकल्प करावा. महोत्सवाच्या निर्विघ्नतेसाठी गणेशाचे पूजन आणि पुण्याह वाचन करावे.
१ आ. व्रतोपवास : नवरात्र स्थापनेपासून अष्टमीपर्यंत प्रतिदिन उपवास करावा. उपवासाच्या पदार्थांमध्ये खरे पहाता दूध आणि फळेच अपेक्षित असतात. असा उपवास करणे शक्य नसेल, तर राज्यपरत्वे प्राप्त होणार्या उपवासाच्या पदार्थांचे सेवन करावे किंवा धान्य फराळ (भाजके अन्न) खावे. प्रकृती अस्वस्थता, वयोमान इत्यादींमुळे प्रतिदिन उपवास करणे शक्य नसल्यास किमान अष्टमीचा तरी उपवास करावाच.
१ इ. घटस्थापना – माला बंधन : देवाजवळ सारवलेल्या भूमीवर शुद्ध माती अंथरावी. त्या मातीत जव पेरावे. मध्यभागी घट ठेवावा. घटात जल भरावे. जलात गंधाक्षता, पुष्प घालावे. काष्ठौषधी घालाव्यात. दूर्वा, पंचपल्लव किंवा आंब्याची डहाळी घालावी. सप्तमृत्तिका, पंचरत्न आणि दक्षिणा घालावी. घटाला सूत्र वेष्टन करावे. घटावर पूर्णपात्र (नारळ) ठेवून त्या घटाची पूजा करावी. हे सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न करण्याकरता पुरोहितांना पाचारण करावे. पूजन केलेल्या घटावर प्रतिदिन एक फुलमाळ सोडावी.
१ ई. नित्य पूजन : विधीवत् स्थापन केलेल्या घटाची नित्य षोडशोपचार पूजा आणि आरती करावी.
१ उ. अखंड दीप : देवीजवळ अखंड तेलाचा दिवा स्थापन करावा. महोत्सव समाप्तीपर्यंत त्याचे रक्षण करावे.
अखण्डदीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् ।
उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो धृतव्रतः ॥
– धर्मसिंधु, नवरात्रारंभप्रयोग
अर्थ : देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रात (९ रात्री) अहोरात्र एकचित्ताने व्रतस्थ राहून अखंड दिवा प्रज्वलित करावा.
या मंत्राने दीप पूजन करावे. ‘दीपः प्राणोऽस्य विज्ञेयो ।’ म्हणजे ‘दिवा हा देवतेचा प्राण मानावा.’ यामुळे दिव्याचे अत्यंत काळजीपूर्वक रक्षण करावे.
१ ए. कुमारिका पूजन : कुमारिकांना साक्षात् नवदुर्गेचे स्वरूप मानले जाते. शास्त्रानुसार २ ते १० वयापर्यंतच्या अशा कुमारिकांचे पूजन करावयाचे असते.
मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूपधारिणीम् ।
नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यामावाहयाम्यहम् ॥
अर्थ : मातृरूप धारण केलेल्या मंत्राक्षररूपी लक्ष्मीचे, साक्षात् कन्यारूपी नवदुर्गांचे मी आवाहन करतो.
या मंत्राने कुमारिकांचे ध्यान, आवाहन करून प्रतिदिन १-१ कुमारिकांचे किंवा अष्टमी, नवमीस ९ कुमारिकांचे पूजन करावे. पाय धुणे, वस्त्रालंकार, वेणी, गंध, नैवेद्य, फळ, तांबुल, दक्षिणा अशा उपचारांनी पूजन करावे.
१ ऐ. विजयादशमी (दसरा) : आश्विन शुक्ल दशमीला ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर विशेषत्वाने अपराजितादेवीचे पूजन, सीमोल्लंघन, शमीपूजन, अश्मंतक (आपटा) पूजन, शस्त्रपूजन, सोने लुटणे इत्यादी विधी अभिप्रेत आहेत.
विजयादशमीला विजय मुहूर्त मानतात. प्रभु रामचंद्रांनी रावणाचा वध केला, तो हा मुहूर्त; अर्जुनाने अज्ञातवासात शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराट राजाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी केली आणि विजय मिळवला तो हा मुहूर्त; शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी प्रबल दैत्यांवर श्री दुर्गादेवीने विजय प्राप्त केला, तो हा मुहूर्त होय. ब्राह्मणवर्ग या मुहूर्तावर विद्याभ्यास प्रारंभ करतात, क्षत्रिय या मुहूर्तावर शस्त्रास्त्रांचे पूजन करून विजयाची कामना आणि वैश्य (व्यापारी) याच मुहूर्तावर अर्जित धनाचे पूजन करून व्यापार चालू करतात.
१ ओ. सीमोल्लंघन : अपराण्ह काळी (दुपारनंतर) गावाच्या सीमेबाहेर सीमोल्लंघनासाठी जावे, जेथे शमी किवा अश्मंतक (आपटा) वृक्ष दिसेल तेथे थांबावे.
शमी शममते पापं शमी लोहितकण्टका ।
धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥
करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ।
तत्र निर्विघ्नकर्ती त्वं भव श्रीरामपूजिते ॥
– धर्मसिन्धु, परिच्छेद २, विजयादशमीनिर्णय
अर्थ : शमी पापांचे शमन करते. शमीचे काटे तांब्याच्या रंगाचे असतात. शमी रामाची स्तुती करते, तसेच अर्जुनाचे बाणही धारण करते. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघेन. तू माझी ही यात्रा निर्विघ्न आणि सुखकारक कर.
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शन देहि कुरू शत्रुविनाशनम् ॥
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. मला माझ्या मित्रांची भेट करून दे आणि माझ्या शत्रूचा नाश कर.
१ औ. अपराजिता पूजन : ईशान्य दिशेस शमी वृक्षाजवळ गोमयाने भूमी सारवून त्यावर गंधाने अष्टदल काढावे. मध्यभागी ‘अपराजितायै नमः ।’ या मंत्राने अपराजितादेवीचे आवाहन करावे. देवीच्या उजव्या बाजूस ‘क्रियाशक्त्यै नमः ।’ या मंत्राने जयादेवी आणि डाव्या बाजूस ‘उमायै नमः ।’ या मंत्राने विजयादेवीचे आवाहन करावे. षोडशोपचार पूजन करावे.
इमां पूजां मया देवि यथाशक्ती निवेदिताम् ।
रक्षार्थं तु समादाय व्रज स्वस्थानमुत्तमम् ॥
अर्थ : हे देवी, मी ही पूजा तुझ्या सेवेसाठी यथाशक्ती समर्पित केली आहे. माझ्या रक्षणासाठी आलेल्या तू आता उत्तम अशा स्वस्थानी गमन करावे.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ॥
– धर्मसिन्धु, परिच्छेद २, विजयादशमीनिर्णय
अर्थ : गळ्यात चित्रविचित्र हार, तसेच कटीवर सोन्याचा मेखला धारण करणार्या, भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणार्या हे देवी अपराजिते, मला विजयी कर.
यानंतर राजाने शत्रूची प्रतिमा करून शस्त्राने छेदन करावी. शमीच्या मुळाजवळील माती अक्षतांसह घ्यावी आणि वाजतगाजत घरी आणावी, घराजवळ आल्यावर सौभाग्यवती स्त्रियांनी दिव्यांनी ओवाळल्यावर घरात प्रवेश करावा.
२. कोजागरी पौर्णिमा
अश्विन शुद्ध पौर्णिमेला ‘कोजागर्ती पौर्णिमा’ म्हणतात. ‘कोजागर्ती’ या संस्कृत शब्दाचे मराठीत रूपांतर आहे कोजागरी. या पौर्णिमेला नवरात्र पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत. ‘महालक्ष्मी या दिवशी घराघरांतून कोजागर्ती म्हणजेच कोण जागे आहे ?’, हे पहाण्याकरता येत असते. जागे रहाणे म्हणजे केवळ न झोपणे, असा अर्थ अभिप्रेत नसून येथे जागरूकता अभिप्रेत आहे. ‘जर मनुष्य जागरूक राहिला, तर कोणतेही संकट त्याच्यावर येणार नाही आणि सुखसमृद्धीने तो संपन्न राहील’, हा या व्रतातील बोध होय.
या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे ऐरावतासह पूजन करून केशरयुक्त दुधाचा प्रसाद वाटला जातो. रात्री जागरण करून लक्ष्मीची आराधना केली जाते. या दिवशी ज्येष्ठ अपत्याच्या आयुष्यवृद्धीकरता औक्षण करावयाचे असते.
३. दिवाळी
वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत दिवाळी साजरी केली जाते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा महोत्सव आहे.
३ अ. गोवत्स द्वादशी : आश्विन कृष्ण द्वादशीला ‘गोवत्स द्वादशी’ किंवा ‘वसुबारस’ असे म्हणतात. गोमाता ही आपली संस्कृती आहे. सर्व देवीदेवता जेथे एकत्र नांदतात, ती महाशक्ती गोमाता होय. या दिवशी सवत्स गोमातेची पूजा करून नैवेद्य अर्पण करतात.
सर्वदेवमये देवि सर्वदेवैरलङ्कृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरु नन्द़िनि ॥
अर्थ : जिच्यामध्ये सर्व देवतांचा वास आहे, अशा सर्व देवतांनी अलंकृत असलेल्या हे देवी नंदिनी, हे गोमाते, माझी मनोकामना पूर्ण कर.
याच दिवशी श्रीकृष्णाने गायी, वत्स यांच्यासाठी गोवर्धन पर्वताचे पूजन केले होते.
३ आ. धनत्रयोदशी : आश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ म्हणतात. समुद्रमंथनाचे वेळी क्षीरसागरातून लक्ष्मी प्रसन्न झाली ती याच दिवशी ! म्हणून या दिवसाला ‘लक्ष्मीजयंती’ असेही म्हणतात. या दिवशी सन्मार्गाने आणि स्वकष्टाने कमावलेल्या धनाची पूजा करावयाची असते. अपमृत्यूचा नाश होण्याकरता रात्रीच्या आरंभी घराबाहेर यमदेवतेसाठी दक्षिणाभिमुख दीप लावावा. आयुर्वेदाची प्रमुख देवता धन्वन्तरिही याच दिवशी प्रकट झाली. धन्वन्तरिच्या पूजनाने आयुष्य आणि आरोग्याची अभिवृद्धी होत असते. हा दिवस स्त्रियांच्या मंगल स्नानाचा दिवस मानला जातो.
३ इ. नरक चतुदर्शी : आश्विन कृष्ण चतुर्दशीला ‘नरक चतुर्दशी’ म्हणतात. भगवान गोपाल कृष्णाने सत्यभामेच्या साहाय्याने नरकासुराचा वध केला तो हा दिवस होय. नरकाची भीती बाळगणार्यांनी तिळाचे तेल अंगास लावून अभ्यंग स्नान करावे. यम तर्पण करावे. प्रदोषकाळी घर, अंगण, गोठा, देवालय, मठ, उद्यान इत्यादी सर्वत्र दीप प्रज्वलित करावेत. हा दिवस पुरुषांच्या अभ्यंग स्नानाचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाचे आत्यंतिक महत्त्व आहे. या दिवशी ‘श्रीकृष्णाची सत्यभामेसह पूजा केली असता पापसंचय नष्ट होऊन नरकवास चुकतो’, असे म्हटले जाते.
३ ई. आश्विन अमावास्या – लक्ष्मीपूजन : क्षीरसागरातून प्रकट झालेल्या महालक्ष्मीची देव आणि ऋषी यांनी पूजन केले तो हा दिवस. या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान, प्रदोषकाळी दीपदान, लक्ष्मीपूजन, मध्यरात्री अलक्ष्मी निःसारण इत्यादी विधी सांगितले आहेत. लक्ष्मी ही विष्णुची पत्नी असून ती धन, धान्य, संपत्ती, वैभव यांची अधिष्ठात्री देवता आहे. लक्ष्मीपूजनात तिच्यासह धन, कुबेर, लेखन साहित्य यांचीही आराधना केली जाते. या पूजेत लक्ष्मीला तांदळाच्या अक्षता न वहाता धने अक्षता म्हणून वाहिले जातात. लाह्या, बत्तासे, मिष्टान्न इत्यादींचा नैवेद्य समर्पित केला जातो. मध्यरात्री घरातील अलक्ष्मी निघून जावी; म्हणून स्त्रिया सूप वाजवून किंवा घरातील केर बाहेर काढून अलक्ष्मी निःसारण करतात. या दिवशी केवळ घरातच नव्हे, तर व्यापारी, उद्योजक हेही आपापल्या कार्यक्षेत्री लक्ष्मीपूजन संपन्न करतात. या लक्ष्मीपूजनाने घरात लक्ष्मीचा अखंड वास रहातो.
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवतु (भगवन्) त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि सम्पदः ॥
अर्थ : हे धनसंपत्ती देणार्या देवा, तू निधीपद्माचा (संपत्तीचा) स्वामी आहेस. तुझ्या कृपेने मला धनधान्याने समृद्ध कर, अशी प्रार्थना केली जाते.’
– जगद़्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (साभार : ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम, ऑक्टोबर २०११