इस्रायलप्रश्‍नी भारत सरकारच्या भूमिकेविरुद्ध बोलणार्‍यांवर कारवाई करा ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हमासने इस्रायलवर केलेल्या महाभयंकर आक्रमणानंतर इस्रायलने हमासच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धानंतर उत्तर प्रदेशातील अलीगड विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते. या मोर्च्यांनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायल-हमास संघर्षावर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध बोलणार्‍यांवर कठोर कारवाई करा, असा आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिला.

नवरात्र आणि इतर उत्सव यांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांसमवेत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ च्या माध्यमातून बैठक घेतली होती.त्यात हा आदेश त्यांनी दिला.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध जर कुणी भूमिका घेत असेल, तसेच सामाजिक माध्यमे किंवा धार्मिक स्थळे यांमधून कुणी विखारी विधाने करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अलीगड विद्यापिठाप्रमाणेच चेन्नई आणि कोलकाता येथेही इस्रायलच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. ‘एस्.आय.ओ.  इंडिया’ नावाची संघटना इस्रायलच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे.