ठाणे जिल्‍ह्यातील चिखलोली रेल्‍वेस्‍थानकाच्‍या उभारणीला वेग येणार !

ठाणे, १२ ऑक्‍टोबर (वार्ता.) – अंबरनाथ आणि बदलापूर रेल्‍वेस्‍थानकांच्‍या दरम्‍यान मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्‍या चिखलोली रेल्‍वेस्‍थानकाच्‍या उभारणीला आता वेग येणार आहे. फलाटाच्‍या निर्मितीसह अन्‍य कामांसाठी ‘मुंबई रेल्‍वे विकास कॉर्पोरेशन’च्‍या वतीने ८१ कोटी ९३ लाख रुपयांच्‍या निविदा घोषित करण्‍यात आल्‍या आहेत.

चिखलोली हा परिसर वेगाने विकसित झाल्‍याने तेथील लोकसंख्‍या पर्यायाने प्रवाशांची संख्‍याही वाढली आहे. त्‍यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्‍वेस्‍थानकांच्‍या दरम्‍यान नवे स्‍थानक उभारण्‍याची मागणी होत होती. स्‍थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्‍या माध्‍यमातून या स्‍थानकाच्‍या उभारणीसाठी सातत्‍याने प्रयत्न केले जात होते. वर्ष २०१९ मध्‍ये प्रत्‍यक्ष कामाची प्रक्रिया चालू झाली, तर वर्ष २०२० मध्‍ये स्‍थानकाच्‍या कामासाठी आवश्‍यक जागेची पहाणी रेल्‍वे प्रशासनाने उपविभागीय अधिकार्‍यांच्‍या आणि तहसील प्रशासनाच्‍या उपस्‍थितीत केली होती. त्‍याविषयीची अधिसूचना यापूर्वीच घोषित करण्‍यात आली होती. त्‍यामुळे चिखलोली स्‍थानकाच्‍या उभारणीला गती मिळाली आहे.