सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि प्रथम आबदिक श्राद्ध यांचे सूक्ष्म परीक्षण !

‘सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू (देहत्‍यागाच्‍या वेळचे वय ७४ वर्षें) यांचे ४ जुलै २०२३ या दिवशी अब्‍दपूर्ती (वर्षपूर्ती) श्राद्ध आणि ५ जुलै २०२३ या दिवशी प्रथम आबदिक (पहिल्‍या वर्षाचे ) श्राद्ध झाले. त्‍या वेळी देवाच्‍या कृपेने माझ्‍याकडून संक्षिप्‍त स्‍वरूपात झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

(कै.) सौ. शालिनी मराठे

१. ४.५.२०२३ या दिवशी झालेल्‍या अब्‍दपूर्ती श्राद्धाचे सूक्ष्म परीक्षण

व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍यूच्‍या तिथीला एक वर्ष पूर्ण होण्‍यासाठी एक दिवस शेष असतांना ‘अब्‍दपूर्ती श्राद्ध’ केले जाते. या श्राद्धात व्‍यक्‍तीच्‍या देहत्‍यागापासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत धर्मशास्‍त्रात सांगितल्‍याप्रमाणे मासिक श्राद्ध आणि अर्धवार्षिक श्राद्ध, जे त्‍या त्‍या वेळी करणे शक्‍य झाले नाही, ती सर्व श्राद्धे अब्‍दपूर्ती श्राद्धाच्‍या वेळी केली जातात. या श्राद्धाच्‍या वेळी सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेली सूत्रे पुढील प्रमाणे आहेत.

१ अ. देवब्राह्मण आणि पितृब्राह्मण यांच्‍यासाठी मांडलेल्‍या पाटांवर अभिमंत्रित करून ठेवलेल्‍या दर्भामध्‍ये त्‍यांचे आवाहन करून त्‍यांचे पूजन करतांना सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे : दर्भामध्‍ये कार्यरत असणार्‍या तेजतत्त्वामध्‍ये देव, पितर आणि ऋषि यांची स्‍पंदने खेचून घेऊन ती दीर्घकाळ धारण करून ठेवण्‍याची दैवी क्षमता असते. त्‍यामुळे ‘देवब्राह्मणासाठी पाटावर ठेवलेल्‍या दर्भाच्‍या ठिकाणी पुरुरव-आर्द्रव आणि धुरिलोचन हे पितरांशी संबंधित असलेले विश्‍वेदेव आणि पितृब्राह्मणांसाठी पाटावर ठेवलेल्‍या दर्भाच्‍या ठिकाणी मराठे कुळाचे मूळपुरुष (हे सात्त्विक असल्‍यामुळे) सूक्ष्मातून उपस्‍थित असल्‍याचे जाणवले. देवपितरांसाठी मांडलेल्‍या पाटासह मराठे कुळाचे मूळपुरुष हे सात्त्विक असल्‍यामुळे पितरांसाठी मांडलेल्‍या पाटाकडेही पाहून चांगली स्‍पंदने जाणवत होती.

१ आ. श्राद्धात मांडलेल्‍या तीन पिंडांकडे पाहून सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेली सूत्रे : श्राद्धात ठेवलेल्‍या ३ पिंडांपैकी वसुगणात पू. शालिनी मराठेकाकूंसाठी १ पिंड, रुद्रगणातील पितर, म्‍हणजे पू. शालिनी मराठेकाकूंच्‍या सासूबाईंसाठी आणि यजमान श्री. प्रकाश मराठे यांच्‍या दिवंगत मातोश्री अन् सनातनच्‍या २१ व्‍या संत (कै.) पू. सीताबाई मराठे यांच्‍यासाठी १ पिंड आणि आदित्‍य गणातील पितर, म्‍हणजे पू. सीताबाई मराठे यांच्‍या सासूसाठी १ पिंड, असे एकूण ३ पिंड मांडले होते. ३ पिंडांपैकी पहिला आणि दुसरा पिंड हे संतांशी संबंधित असल्‍यामुळे त्‍यांच्‍याभोवती चैतन्‍याचे वलय कार्यरत असल्‍याचे जाणवले.

कु. मधुरा भिकाजी भोसले

१ इ. श्राद्धविधी करणारे यजमान आणि पुरोहित यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे : श्राद्धविधी करणारे यजमान श्री. प्रकाश मराठे (वय ७९ वर्षे आणि आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) आणि पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर हे संपूर्ण श्राद्धविधी समर्पित भावाने करत होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून भावपूर्णरित्‍या श्राद्धविधी पूर्ण होऊन सभोवतालच्‍या वातावरणात सात्त्विक स्‍पंदने प्रक्षेपित होत होती.

१ ई. श्राद्धविधीच्‍या वेळी ‘पिंडदान’ हा विधी चालू असतांना श्राद्धातील उपचारांचा पिंडांवर झालेला परिणाम : श्राद्ध विधीच्‍या वेळी पू. मराठेकाकूंच्‍या नावाने ठेवलेल्‍या पिंडावर उपचार चालू असतांना धार्मिक विधीतील सात्त्विकता आणि चैतन्‍य यांच्‍या लहरी पिंडाच्‍या माध्‍यमातून भूलोकापासून जनलोकात निवास करणार्‍या पू. मराठेकाकूंच्‍या लिंगदेहापर्यंत पोचत होत्‍या. त्‍यानंतर पू. मराठेकाकूंचा लिंगदेह पृथ्‍वीवरील अवतारी कार्याशी जोडला गेल्‍याने त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचा संकल्‍प जागृत झाला. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून पृथ्‍वीवरील हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि साधक यांच्‍याकडे चैतन्‍य लहरी येऊ लागल्‍या आणि हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याच्‍या कार्यातील व्‍यष्‍टी अन् समष्‍टी अशा दोन्‍ही स्‍तरांवरील ३० टक्‍के अडथळे दूर झाल्‍याचे जाणवले. यावरून ‘संत ब्रह्मांडातील कोणत्‍याही दिव्‍य लोकात असले, तरी त्‍यांच्‍यातील प्रीती आणि समष्‍टी भाव यांमुळे त्‍यांच्‍याकडून समष्‍टीच्‍या कल्‍याणासाठी दैवी कार्य सहजरित्‍या पूर्ण होत असते’, हे सूत्र शिकायला मिळाले.

१ उ. श्राद्धाच्‍या ठिकाणी जाणवणारी स्‍पंदने : श्राद्धविधी पहात असतांना तेथे ‘श्राद्धकर्म चालू नसून सत्‍यनारायणाची पूजाच चालू आहे’, अशी सात्त्विक आणि चैतन्‍यदायी स्‍पंदने जाणवून मला विष्‍णुतत्त्वाची अनुभूती आली. सभोवतालच्‍या वातावरणातही कधी वैकुंठाची, तर कधी जनलोकाची स्‍पंदने कार्यरत झाल्‍याची प्रचीची येत होती आणि माझे मन ते दिव्‍य लोकांचे सूक्ष्म वायुमंडल अनुभवून आनंदित होत होते.

१ ऊ. पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या लिंगदेहाचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सूक्ष्म रूपाशी सूक्ष्मातून झालेला संवाद : श्राद्धाच्‍या ठिकाणी पू. शालिनी मराठेकाकू यांचा पिवळसर रंगाचा आणि  किंचित पारदर्शक असणारा लिंगदेह आल्‍याचे जाणवले. तेव्‍हा त्‍यांना भेटण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे एक सूक्ष्म रूप श्राद्धाच्‍या ठिकाणी आल्‍याचे जाणवले. तेव्‍हा ‘शिष्‍याच्‍या मृत्‍यूनंतरही गुरु त्‍याची किती काळजी घेतात आणि त्‍याच्‍यासाठी किती करतात’, या विचाराने पू. शालिनी मराठेकाकू यांच्‍या लिंगदेहाची भावजागृती झाली आणि हा गोळा श्रीगुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी पू. शालिनी मराठेकाकू यांच्‍या चरणांपर्यंत पोचला. तेव्‍हा पू. शालिनी मराठेकाकू यांनी त्‍यांना मनोमन खाली वाकून नमस्‍कार केला. तेव्‍हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणांशी पिवळसर रंगाच्‍या गोळ्‍याच्‍या रूपाने आलेल्‍या पू. शालिनी मराठेकाकू यांच्‍या लिंगदेहाला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कौतुकाने उचलून ओंजळीत घेतले. तेव्‍हा तो गोळा विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या हृदयात विलीन झाल्‍याचे मला जाणवले.

२. ५.५.२०२३ या दिवशी प्रथम आबदिक श्राद्धाचे सूक्ष्म परीक्षण

पुढील एक वर्षासाठी मृत्‍यू झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या लिंगदेहाला अन्‍न आणि जल मिळावे, यासाठी हे वर्षश्राद्ध केले जाते. या श्राद्धाच्‍या वेळी मला सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

२ अ. श्राद्धाच्‍या वेळी बनवलेले तीलोदक आणि यवोदक यांच्‍या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे : श्राद्धाच्‍या वेळी तीलोदक (तीळ मिश्रित पाणी) आणि यवोदक (जव मिश्रित पाणी) बनवून पुरुषसूक्‍त म्‍हणत संपूर्ण स्‍थानाची शुद्धी केली गेली. तेव्‍हा तीलोदकात पुरुरव-आर्द्रव आणि धुरिलोचन हे पितरांशी संबंधित असलेले विश्‍वेदेव आणि यवोदकात देवब्राह्मणरूपी अर्यमा देवाची स्‍पंदने आकृष्‍ट झाल्‍याचे जाणवले. पुरोहितांनी पुरुषसूक्‍त म्‍हटल्‍याने श्रीविष्‍णुस्‍वरूप विराट पुरुषरूपी किंवा आदि पुरुषरूपी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, पितरांशी संबंधित असणारे विश्‍वेदेव आणि सर्व पितरांशी संबंधित असणारा ‘अर्यमा’ हा प्रमुख देव प्रसन्‍न झाल्‍याचे जाणवले. संपूर्ण स्‍थानाची जलाने शुद्धी केल्‍यामुळे तेथील नकारात्‍मक स्‍पंदने नष्‍ट होऊन तेथे केवळ पितर आणि पितरांशी संबंधित देवता यांच्‍या लहरी कार्यरत होऊन हेे क्षेत्र ‘गया’ या तीर्थक्षेत्रातील लहरींनी भारित झाले. त्‍यामुळे या ठिकाणी केलेल्‍या श्राद्धकर्माचे फळ गयेला केलेल्‍या श्राद्धकर्माप्रमाणे अत्‍यंत लाभदायी आणि शुभदायी मिळाले.

२ आ. श्राद्धाच्‍या वेळी पितृब्राह्मणांच्‍या ठिकाणी बसलेले श्री. सिद्धेश करंदीकर यांच्‍या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे : श्राद्धाच्‍या वेळी पितृब्राह्मणांच्‍या ठिकाणी श्री. सिद्धेश करंदीकर दक्षिण दिशेला तोंड करून बसले होते. धर्मशास्‍त्रात काही ठिकाणी यमदेवालाही ‘पितरांशी संबंधित असणारा देव’ मानलेले आहे. त्‍यामुळे दक्षिणाभिमुख बसलेल्‍या श्री. सिद्धेश करंदीकर यांच्‍याकडे दक्षिण दिशेकडून येणार्‍या यमलहरींचा परिणाम अधिक प्रमाणात होऊन त्‍यांच्‍यामध्‍ये पू. मराठेकाकूंशी निगडित असणार्‍या पितरांची स्‍पंदने कार्यरत झाली होती. त्‍यामुळे जेव्‍हा श्री. सिद्धेश करंदीकर यांचे पूजन झाले, तेव्‍हा पू. मराठेकाकूंशी निगडित असणार्‍या पितरांचेही पूजन झाले. तसेच जेव्‍हा श्री. सिद्धेश करंदीकर यांनी भोजन ग्रहण केले, तेव्‍हा त्‍यांच्‍या माध्‍यमातून पू. मराठेकाकूंशी निगडित असणार्‍या पितरांनी भोजन ग्रहण केल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे ते पितर तृप्‍त झाले आणि त्‍यांनी ‘संपूर्ण मराठे कुळाचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्‍कर्ष होऊ दे’, असा कृपाशीर्वाद दिला.

२ इ. श्राद्धाच्‍या वेळी देवब्राह्मणांच्‍या ठिकाणी बसलेले  श्री. अमर जोशी यांच्‍या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे : श्राद्धाच्‍या वेळी देवब्राह्मणांच्‍या ठिकाणी श्री. अमर जोशी पूर्व दिशेला तोंड करून बसले होते. त्‍यांच्‍याकडे पूर्वदिशेने येणार्‍या आदित्‍याच्‍या, म्‍हणजे सूर्याच्‍या तेजोलहरी अधिक प्रमाणात ग्रहण झाल्‍या. त्‍यामुळे पूर्वजांशी संबंधित असणार्‍या अजानज लोकातील सूर्याच्‍या ‘अर्क’ या रूपाचे तत्त्व देवब्राह्मणांचे प्रतीक असलेल्‍या श्री. अमर जोशी यांच्‍यामध्‍ये कार्यरत झाले. त्‍याचप्रमाणे पितरांची गणना ‘वसु, रुद्र आणि आदित्‍य’ या गणांमध्‍ये करून त्‍यांना पितरलोकात, अजानजलोकात आणि अन्‍य लोकांत स्‍थान देण्‍याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या ‘अर्यमा’ या सूर्याच्‍या एका रूपाचे तत्त्व कार्यरत झाले होते. त्‍यामुळे जेव्‍हा श्री. अमर जोशी यांचे पूजन झाले, तेव्‍हा पितरांशी निगडित असणार्‍या अर्क, अर्यमा, कव्‍यवाह (अग्‍नीचे एक रूप), सोम, चित्रगुप्‍त आणि पुरुरव-आर्द्रव आणि धुरिलोचन हे विश्‍वेदेव (पितरांशी संबंधित असणार्‍या देवता) यांचेही पूजन झाले. तसेच जेव्‍हा श्री. अमर जोशी यांनी भोजन ग्रहण केले, तेव्‍हा त्‍यांच्‍यामध्‍ये अग्‍नीचे ‘कव्‍यवाह’ हे रूप पितृकार्याशी संबंधित असणारे रूप कार्यरत झाले. तेव्‍हा त्‍यांनी ग्रहण केलेल्‍या अन्‍नरूपी आहुतीचे भक्षण श्रीअग्‍नीदेवाच्‍या पितरांशी संबंधित असणार्‍या ‘स्‍वधा’ नावाच्‍या पत्नीने’ ग्रहण करून त्‍या आहुतीचा हविर्भाग पितरांशी संबंधित असणार्‍या देवतांपर्यंत पोचवला. त्‍यामुळे श्री. अमर जोशी यांच्‍या माध्‍यमातून पितरांशी संबंधित असणार्‍या वरील देवतांनी भोजन ग्रहण केल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे ते देव तृप्‍त झाले आणि त्‍यांनी ‘संपूर्ण मराठे कुळातील पितरांना सद़्‍गती प्राप्‍त होऊन संपूर्ण कुळाचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्‍कर्ष होऊ दे’, असा कृपाशीर्वाद दिला.

३. अब्‍दपूर्ती श्राद्ध आणि प्रथम आबदिक श्राद्ध यांचे आध्‍यात्मिकदृष्‍ट्या तौलनिक महत्त्व !

टीप – मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या लिंगदेहातील सर्व प्रकारच्‍या वासना आणि देहबुद्धी मृत्‍यूनंतर १ वर्षापर्यंत सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असतात. वर्ष श्राद्धानंतर मृत व्‍यक्‍तीला प्रेतयोनीतून मुक्‍ती मिळून तिला पितरलोकात स्‍थान प्राप्‍त होते. त्‍यामुळे तिच्‍या सर्व वासना न्‍यून होऊन तिची देहबुद्धी न्‍यून होते.  त्‍यामुळे तिच्‍यासाठी केलेल्‍या अब्‍दपूर्ती श्राद्धाची परिणामकारकता वर्षश्राद्धापेक्षा अधिक असते.

४. संतांचा श्राद्धविधी करण्‍यासंदर्भातील आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ

संतांची आध्‍यात्मिक ऊर्जा पुष्‍कळ प्रमाणात कार्यरत असल्‍यामुळे त्‍यांनी देहत्‍याग केल्‍यावरही जनलोक, तपोलोक किंवा सत्‍यलोक येथे राहून पुढील साधना करण्‍यासाठी त्‍यांना आंतरिक ऊर्जा सतत मिळत असते. त्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी श्राद्धादि विधी करून त्‍यांना बाह्यरूपाने आध्‍यात्मिक ऊर्जा प्रदान करण्‍याची काहीही आवश्‍यकता नसते, तरीही संतांसाठी श्राद्धादि विधी केल्‍यामुळे यजमान, पुरोहित आणि श्राद्धाशी संबंधित सेवा करणारे साधक यांच्‍यावर संतांची कृपा होऊन त्‍यांच्‍या साधनेतील अडथळे दूर होऊन त्‍यांची साधना अधिक चांगल्‍या प्रकारे होण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सनातनच्‍या दिवंगत संतांचेही श्राद्धादी विधी करण्‍यास सांगतात. संतांच्‍या श्राद्धामुळे संतांना जनलोक, तपोलोक किंवा सत्‍यलोक येथे राहून समष्‍टी साधना करण्‍यासाठी ३० टक्‍के आणि पृथ्‍वीवरील साधकांना हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेत सहभागी होऊन त्‍यांच्‍याकडून समष्‍टी साधना होण्‍यासाठी ७० टक्‍के आध्‍यात्मिक ऊर्जा मिळते.

कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्‍या कृपेमुळे सनातनच्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या अब्‍दपूर्ती श्राद्ध आणि प्रथम आबदिक श्राद्ध यांचे सूक्ष्म परीक्षण करण्‍याची सेवा लाभली’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),(आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२३)

पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू यांच्‍या स्‍मरणार्थ पुढील चारोळी समर्पित !

संतांच्‍या मांदियाळीतील पू. (कै.) सौ. शालिनी मराठेकाकू या असे दिव्‍य विभूती ।
अशा या संतांच्‍या चरणी वसे मोक्ष आणि मुक्‍ती ॥

त्‍या श्रीगुरूंच्‍या लाडक्‍या शिष्‍या
आणि साधकांना प्रिय असती ।
त्‍यांच्‍यातील भावामुळे त्‍यांच्‍या हृदयात
सदैव वसे श्रीगुरूंची मंगलमूर्ती ॥

– सुश्री (कु.) मधुरा भोसले, (१०.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक