सनदी लेखापाल महेश गुरव यांचा जामीन फेटाळला !
न्यायालयाचे निरीक्षण
मुंबई – वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांनी शेतकर्यांची फसवणूक केली, असे मत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातील विशेष न्यायालयाने (‘पी.एम्.एल्.ए.’ने) नोंदवले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील पैसे गैरव्यवहार प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांचे सनदी लेखापाल महेश गुरव यांचा जामीन फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे. शेतकर्यांकडून घेतलेले पैसे खासगी आस्थापनात गुंतवल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
काय आहे प्रकरण ?
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक हेराफेरीचे आरोप केले आहेत. यात मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांची मुले यांचाही समावेश आहे. या प्रकरणात सनदी लेखापाल म्हणून काम करतांना महेश गुरव यांनी पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रणालींचा वापर केला होता, तसेच हे पैसे ‘शेल’ (कोणतेही आर्थिक व्यवहार न करणारी खोटी आस्थापने) आस्थापनांमध्ये वळवले, ज्यात हसन मुश्रीफ यांचे पुत्र संचालक असल्याचा आरोप आहे.
सनदी लेखापाल महेश गुरव यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने त्यांनी जामिनासाठी न्यायालयात आवेदन प्रविष्ट कले होते. ‘प्रथमदर्शी अहवालात नोंद केल्याप्रमाणे मुख्य आरोपी हसन मुश्रीफ आणि त्यांचे साथीदार यांच्या गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या पैशांची ठोस माहिती गुरव यांना होती’, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
हसन मुश्रीफ यांची हकालपट्टी करा ! – विजय वडेट्टीवार
सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविषयी न्यायालयाने अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे सरकारला शेतकर्यांच्या संदर्भात कणव असले, तर शेतकर्यांची फसवणूक करणार्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. |