नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

शासनाची १० कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

नंदुरबार – येथील तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी फेब्रुवारी ते जुलै २०१९ या काळात भूमीचे बनावट दस्तावेज सिद्ध करून शासनाचा १० कोटी ८० लाख रुपयांचा महसूल बुडवला. या प्रकरणी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या तहसीलदारांनी याविषयी तक्रार दिली आहे.

१. नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून बालाजी मंजुळे हे २२ फेब्रुवारी ते १८ जुलै २०१९ या कालावधीत कार्यरत होते. त्यांनी भूमीची फेरफार आणि इतर गोष्टींच्या कायदेशीर कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ते शासनाच्या हानीस कारणीभूत ठरले आहेत. त्यात अनेक बनावट कागदपत्रेही आढळून आल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. त्यांनी एकूण १६ प्रकरणांमध्ये साहाय्यक जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकारी मुद्रांक यांच्याकडून मूल्यांकन अन् अहवाल घेतला नाही, तसेच उर्वरित ४ प्रकरणांत शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

संपादकीय भूमिका :

जिल्हाधिकार्‍यांनी शासनाची फसवणूक करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ होय !