यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच अन्य राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात येतात. आता सर्वसाधारणपणे प्रतिदिन ५ सहस्र भाविक दर्शन घेत आहेत. नवरात्रात हा आकडा लाखात जातो. त्यामुळे यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई येथील ‘आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे ‘विनामूल्य स्वच्छता अभियाना’चा प्रारंभ श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे यांच्या शुभहस्ते स्वच्छता सामग्रीचे पूजन करून करण्यात आला. या अभियानात मुंबई येथील आस्थापनाचे २० आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे १५ असे ३५ कर्मचारी सहभागी आहेत. १० ऑक्टोबरअखेर ही स्वच्छता पूर्ण करण्यात येणार आहे.
१. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. त्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी १८ फूट X १२ फूट लांबीचे ‘एल्.ई.डी.’ बसवण्यात आले आहेत, तर मंदिर परिसरातही ५५ इंचाचे २० छोटे ‘स्क्रीन’ बसवण्यात आले आहेत. मंदिराची स्वच्छता पूर्ण झाल्यावर मौल्यवान अशा दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
२. अपंग असलेल्या भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी चाके असलेल्या आसंद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
३. पिशव्या, ‘पर्स’, तसेच अन्य साहित्य पडताळण्यासाठी एक नवीन ‘स्कॅनर’ (आत काय आहे हे दर्शवणारे यंत्र) मुख्य दर्शनरांगेच्या द्वाराच्या बाहेर बसवण्यात आला आहे. याची चाचणी चालू असून नवरात्रीच्या काळात त्याचा वापर चालू करण्यात येणार आहे.
४. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची ४ ठिकाणी कायमस्वरूपी सोय करण्यात आली असून बाहेरील रांगेत असणार्या भाविकांसाठी यंदा विशेष सोय करण्यात येणार आहे. काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करतील.
५. शेतकरी संघाच्या इमारतीतही दर्शनरांग करण्यात आली आहे. येथे एकावेळी साडेतीन सहस्र भाविक मावतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हिरकणी कक्षही उभारण्यात आला आहे. प्रतिवर्षी भाविकांची संख्या ५ सहस्रच्या पुढे गेल्यावर ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात येते. यंदा तसे न होता शेतकरी संघात करण्यात आलेल्या व्यवस्थेमुळे भाविकांना अत्यंत सुलभतेने दर्शन होणार आहे.
६. भाविकांना प्रत्येक द्वाराचे नाव कळण्यासाठी प्रत्येक द्वारावर ‘दक्षिण दरवाजा’, ‘पूर्व दरवाजा’, ‘पश्चिम दरवाजा’, अशा पाट्या लावण्यात येत आहेत.