सातारा, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्ह्यात पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आतापर्यंत १ सहस्र २८ संशयित रुग्ण तपासण्यात आले होते. या तपासणीनंतर ३१२ जणांना डेंग्यू आणि चिकनगुनिया झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्व रुग्णांवर औषध उपचार करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात १२ ठिकाणी डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ आली होती. सुदैवाने यामध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही.
सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन !
इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवणे. अंगणातील टायर, भंगार सामान, रिकामे डबे, बाटल्या, प्लास्टिकचे साहित्य यांची विल्हेवाट लावणे. घरातील कुलर, फुलदाण्या स्वच्छ करून ठेवणे. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळणे. डासांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारणी, धूर फवारणी आदी करत रहाणे.