मडगाव : मडगाव आणि नावेली येथील काही भोजनालयांवर अन्न आणि औषध प्रशासनाने ५ ऑक्टोबरच्या रात्री धाडी घातल्या. त्या वेळी भोजनालयांमध्ये स्वच्छता नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
या वेळी ८ भोजनालयाच्या परिसराची पहाणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये ‘मे. प्रेरणा पॉईंट’ हे भोजनालय विनापरवाना चालवले जात होते. त्याला प्रशासनाने नोटीस बजावली आहे. ‘मे. स्नॅक्स फॅक्टरी’ येथील अन्वेषणाचा अहवाल बनवण्यात आला असून भोजनालयाला ३ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला. ‘मे. क्रीम आणि स्नॅक्स’, ‘मे. राज भोग रेस्टॉरंट’ आणि ‘मेसर्स खैबर’ या भोजनालयांना सुधारणांच्या संदर्भात तपासणी अहवाल जारी करण्यात आला. ‘मे. अनुष्का’ अस्वच्छतेमुळे बंद करण्यात आले, तर ‘मे. अल् अकबर’ भोजनालय अंशतः बंद करण्यात आले.
अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, ॲबेल रॉडिग्ज, अमित मांद्रेकर आणि अभिषेक नाईक यांच्या गटाने ही कारवाई केली.
संपादकीय भूमिकास्वच्छता नियमांचे पालन न करणार्यांना शिक्षा करायला हवी, तर नियमांचे पालन होईल ! |