पुणे – येथील उद्योजक पुनीत बालन यांना पुणे महापालिकेने शहरभर अनधिकृत ‘होर्डिग्ज’ लावल्यामुळे ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बालन यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्या दिल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडी यांच्या काळात पुनीत बालन अन् त्यांच्या ‘मिनरल वॉटर ब्रॅण्ड’चे संपूर्ण शहरात ‘होर्डिग्ज’ लावण्यात आले होते. त्यांच्या अनधिकृत ‘होर्डिग्ज’मुळे ऐतिहासिक शनिवारवाडा परिसराच्या दर्शनाला अडथळा निर्माण झाला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेही अनेक तक्रारी आल्याने तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. पुनीत बालन यांनी सांगितले की, आपण परदेशात असून पुणे महापालिकेने पाठवलेल्या नोटिसीविषयी आपल्याला काही माहिती नाही, त्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ.
पैसे न भरल्यास मालमत्ता करातून रक्कम वसूल करण्याची चेतावणी !
महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सव काळात विज्ञापनांचे शुल्क माफ केले असले, तरी दहीहंडी उत्सवासाठी अनुमती आवश्यक होती. ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत बालन यांच्या आस्थापनाचे विज्ञापन करणारे अनुमाने २ सहस्र ५०० फलक पुणे शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते. प्रत्येक पॅनेल किमान ४ फूट X ८ फूट या आकाराचा आहे. प्रतिपॅनेल ४० रुपये दैनंदिन शुल्काच्या आधारे दंडाची गणना करून महापालिकेने ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.