(‘कार्बन न्यूट्रॅलिटी’ म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात उत्सर्जन होण्याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचे प्रमाण यांचे योग्य संतुलन साधून निव्वळ शून्य कर्बभार साध्य करणे.)
पुणे – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर या दिवशी ‘कार्बन न्यूट्रॅलिटी सुविधा कक्षा’चे उद़्घाटन करण्यात आले. हा कक्ष पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आला होता. या वेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पी.एम्.पी.एम्.एल्., महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. या कक्षाचे सनियंत्रण सहआयुक्त पूनम मेहता आणि उपायुक्त विजय मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन विभागाकडून करण्यात येणार आहे.
या वेळी श्री. राव म्हणाले, ‘‘अतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या पर्यावरणीय हानीपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ‘कार्बन न्यूट्रॅलिटी सुविधा कक्ष’ काळाची आवश्यकता असल्यामुळे स्वयंस्फूर्तीने स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कार्बनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कार्बन स्थिरीकरणाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे, हा या कक्ष स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.’’