धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

‘मी आपणाला अनेक संदर्भात सांगितले आहे की, मी एक संन्यासी आहे. संन्यासाच्या आधी तर बोलतच असे; पण संन्यास दीक्षेनंतरही देव,धर्म आणि त्याला आवश्यक अन् योग्य ते राजकारण याखेरीज मी कधी बोललोच नाही; कारण बैठकीला एखादा मनुष्य आला की, तो जो विषय बोलेल, तो मी बोललो. मग तो विषय धर्माचा असेल, संस्कृतीचा असेल, परंपरेचा असेल, परमार्थाचा असेल किंवा राजकारणाचा असेल. काही पुण्यात्मे असे आहेत की, ते म्हणतात, ‘‘संन्याशाने धर्म, परमार्थ यांची चर्चा करावी, राजकारणाची चर्चा कशाला करावी ?’’ ‘‘अरे ! राजकारणाचा जाच प्रतिदिन होतो, ते कसे दुरुस्त करावे, हे संन्याशाने सांगायचे नाही, तर सांगायचे कुणी ? ते मी माझे काम समजत गेलो आणि सांगत गेलो.’’ काही लोकांना आवडले नाही, तर पुष्कळांना आवडले; पण हे करत असतांनाही ‘निदान संन्यासी झाल्यावर तरी हे करायला नको होते’, असे सांगणारे लोक होते. मी त्यांना सांगितले, ‘‘धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा. बाकीच्यांना विचार करायला सवड नसते. विचार कसा करावा ? हे त्याला सांगायला संन्यासी मोकळा असतो आणि त्याने ते सांगितले पाहिजे.’’

– ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

(वैद्य परिक्षित शेवडे यांच्या फेसबुकवरून साभार)