नागपूर येथील बुकी अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला !

‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याचे प्रकरण

नागपूर – व्‍यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बुकी (जुगारात पैज लावणारी व्‍यक्‍ती) अनंत उपाख्‍य सोंटू जैन याचा जामीन अर्ज मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने २६ सप्‍टेंबर या दिवशी फेटाळला. यापूर्वी २२ सप्‍टेंबर या दिवशी सोंटू याच्‍या जामीन अर्जावर युक्‍तीवाद पूर्ण करण्‍यात आला होता. या प्रकरणी न्‍यायालयाने निकाल २६ सप्‍टेंबरपर्यंत राखून ठेवला होता.

न्‍यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्‍या समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. सध्‍या चालू असलेल्‍या अन्‍वेषणासाठी अनंत जैन याची पोलीस कोठडीत चौकशी आवश्‍यक असल्‍याच्‍या विश्‍वासावर न्‍यायालयाने या नकाराचे कारण दिले. ‘या खटल्‍याशी संबंधित पुरावे आणि माहिती गोळा करण्‍यासाठी जैन याला पोलीस कोठडीत ठेवणे अन् त्‍याची चौकशी करणे आवश्‍यक आहे’, असे न्‍यायालयाने म्‍हटले. अटकपूर्व जामीन संमत केल्‍यानंतर त्‍याची अटक टाळता आली असती. त्‍यामुळे ‘अन्‍वेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असता’, असा निष्‍कर्ष न्‍यायालयाने काढला.