गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका प्रशासन पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. यंदाच्या वर्षी नैसर्गिक प्रवाहात मूर्ती विसर्जनावर अप्रत्यक्ष बंदी असल्याने पुणे महानगरपालिकेकडून शहराच्या विविध भागांत अनुमाने ४५५ कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना मूर्ती संकलन केंद्रे, तसेच कृत्रिम विसर्जन हौद यांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाने माहिती मागवली आहे. नागरिकांकडून नदी, नाले, कॅनॉल, विहिरी यांसह इतर नैसर्गिक जलस्रोत असलेल्या ठिकाणी या मूर्ती विसर्जित करून ‘ही ठिकाणे प्रदूषित केली जाऊ नयेत’, यासाठी महानगरपालिकेकडून दक्षता घेतली जाणार आहे. या वेळी पुणे महानगरपालिकेने ‘श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नको, दान करा’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खरेतर मूर्तीविसर्जनाने कोणतेही प्रदूषण होत नाही’, असा अहवाल महाराष्ट्र, तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनीही दिला आहे. ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि तेही वहात्या पाण्यात करावे’, असे धर्मशास्त्र आहे. फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर लाखो रुपयांचा व्यय करण्यापेक्षा पालिकेने वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी आणि श्री गणेशाची होणारी विटंबना रोखावी ! (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
१. पुणे महानगरपालिकेने राबवलेले धर्मद्रोही उपक्रम !
१ अ. दानात आलेल्या मूर्तींची पुनर्विक्री : पुणे महानगरपालिकेने ‘मूर्तीदान’ उपक्रमाअंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्यात आली. अशा प्रकारे मूर्तींची पुनर्विक्री करण्यासाठी अनुमती देत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे उघड झाले होते. ‘किती मूर्ती दान मिळाल्या ? किती मूर्ती विकल्या ? त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरणार ? पालिकेच्या आवाहनावर विश्वास ठेवून या सर्व गोष्टी विसर्जनासाठी मूर्तीदान करणार्या भाविकांपासून का लपवल्या ?’, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात. हा गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणारा, तसेच भाविक आणि मूर्तीकार यांची घोर फसवणूक करणारा ‘मूर्तीदान घोटाळा’च आहे, असे वाटल्यास आश्चर्य ते काय ? फिरत्या हौदांच्या निर्मितीसाठी पालिका प्रशासनाने कचरापेट्यांचा उपयोग केल्याचे उघडकीस आले होते. पालिका प्रशासन आणि सामाजिक संस्था यांना अशा प्रकारे विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्ती परस्पर विकण्याचा अधिकार आहे का ?
१ आ. श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने वर्ष २०२१ मध्ये दान घेतलेल्या १३ सहस्र ७५८ श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन केले. मग ‘या मूर्ती दान केल्या’, असे म्हणता येईल का ?’, असा प्रश्न करत महापालिकेकडून दान घेतलेल्या मूर्तींचे विसर्जन करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला होता.
१ इ. वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्रतिबंध ! : कोरोना महामारीचे कारण पुढे करत वर्ष २०२१ मध्ये प्रशासनाने भाविकांना श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्रतिबंध केला होता. ‘या मूर्ती संकलन केंद्रांवर दान करा, फिरत्या रथावर विसर्जित करा; अन्यथा घरीच विसर्जन करा’, असे आवाहन प्रशासनाने केले होते.
१ ई. बुलडोझरद्वारे मूर्तींची विल्हेवाट लावणे : काही ठिकाणी पालिका प्रशासनच श्री गणेशमूर्तींवर बुलडोझर फिरवून त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास आले होते. बुलडोझरने मूर्ती चिरडणे तसेच भाविकांच्या श्रद्धास्थानांशी केलेली प्रतारणा आहे. ही श्री गणेशाची अक्षम्य आणि घोर विटंबना आहे.
१ उ. श्री गणेशमूर्ती धुळीत ठेवणे : हौदात विसर्जित केलेल्या, तसेच मूर्तीदान केलेल्या श्री गणेशमूर्ती मागील वर्षी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडून वडगाव बुद्रुक येथील पुणे मनपा शिक्षण विभाग संचलित शाळेच्या वर्गामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. श्री गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या, प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना त्या वर्षभर धुळीत ठेवणे, हे गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ करण्यासारखे नव्हे का ?
२. दान केलेल्या मूर्तींची विटंबना आणि त्यांची पुनर्विक्री !
दान केलेल्या मूर्ती खाणीत टाकल्या जातात. रस्ता बुजवण्यासाठी गणेशमूर्तीचा वापर केला जातो. नाल्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले जाते. असे होत असेल, तर आपण श्री गणेशाची कृपा संपादन करू शकतो का ? महापालिकेकडून मूर्तीदान घेतल्याचे सांगितले किंवा दाखवले जाते. प्रत्यक्षात दान केलेल्या मूर्ती एका बंद पडलेल्या खाणीमध्ये नेल्या जातात आणि तिथे यंत्राद्वारे विसर्जित केल्या जातात, असे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी कथित पर्यावरणवादी संघटना गणेशमूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तीकारांना विकण्यात येतात, असेही लक्षात आले आहे.
३. मूर्तीदान अशास्त्रीय का ?
‘भाद्रपद मासातील श्री गणेशचतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे’, असा शास्त्रोक्त विधी आहे. देवतांच्या मूर्तींचे दान घेणे किंवा देणे, हा देवतांचा अवमान आहे. देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही. मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नाही की, जिचा उपयोग संपला; म्हणून ती दुसर्याला दान दिली. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात. वहात्या पाण्यात विसर्जन करणे हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. या कारणांमुळे श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी भाविकांनी श्री गणेशमूर्तीचे दान न करता वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे.
प्रदूषणाच्या काळजीचा देखावा करणारे प्रशासन भाविकांची फसवणूक करत असून अशा कुठल्याही फसवणुकीला बळी न पडता भाविकांनी दान घेतलेल्या किंवा हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे पुढे काय होते, याचे वास्तव जाणून धर्मशास्त्राप्रमाणे कृती करून श्री गणेशाची कृपा संपादन करावी !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे