मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे !

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !

जालना – मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालू होते. १४ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी करून आंदोलन आणि सरकारची भूमिका यांविषयी संवाद साधून उपोषण सोडण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी १७ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण सोडले. ते रुग्णालयात भरती होऊन उपचारही घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार प्रयत्नरत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

मनोज जरांगे पाटील यांनी उपोेषण सोडल्यानंतर त्यांचे आभार मानतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोक इतर जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि ते नियमांच्या आधारावर टिकून रहाण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाज अतिशय शिस्तप्रिय आहे. असे असतांना झालेल्या लाठीमारामुळे गालबोट लागले. यात ज्यांचा दोष होता, त्यांना निलंबित केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर क्षमा मागितली आहे. या घटनेविषयी मलाही खंत आहे. ज्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो, त्याच्याच मागे जनता उभी रहाते. मनोज जरांगे स्वत:साठी नाही, तर समाजासाठी लढत आहेत. त्यांनी कधीही स्वत:च्या लाभासाठी कोणताही प्रश्‍न मांडलेला नाही. मनोज जरांगे यांना मनापासून शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करत आहे.

आरक्षण मिळाल्याविना मागे हटणार नाही ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील

या वेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जीव गेला तरी चालेल; पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याविना शांत बसणार नाही. सरकारचा १ मासाचा प्रस्ताव होता. समाजाच्या वतीने मी १० दिवस अधिक देतो; पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याविना मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आहे. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात, असा मला विश्‍वास होता. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे वडीलही उपोषणस्थळी आले होते. त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्यासह शासनाचे अधिकारीही चर्चेसाठी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे मुख्यमंत्र्यांना १३ सप्टेंबर या दिवशीचा दौरा रहित करावा लागला होता. मध्यरात्री राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी २ घंटे चर्चा केली. यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश होता. ही चर्चा सकारात्मक झाली आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.