सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे सरकारकडे मागणी !
सोलापूर, १३ सप्टेंबर (वार्ता.) – केंद्र सरकारने ६ मासांसाठी ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची जी अनुमती दिली आहे, ती रहित करण्यात यावी, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा आणि त्याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू ढगे यांनी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त ते बोलत होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, विक्रम घोडके, मिनेश पुजारे, गोपी व्हनमारे, धनंजय बोकडे, तुलसीदास चिंताकिंदी, आप्पासाहेब गवळी, कु. वर्षा जेवळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. सध्या चातुर्मास चालू आहे आणि श्री गणेशचतुर्थीही येत आहे. अशा वेळी हिंदूंनी घरात हलाल प्रमाणित उत्पादने येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन श्री. विक्रम घोडके यांनी या वेळी केले. या वेळी मागण्यांचे निवेदन महसूल तहसीलदार दत्तात्रय मोहोळे यांना देण्यात आले.