१. सर्व कुटुंबियांनी सनातनच्या सत्संगाला जाणे आणि सेवेच्या माध्यमातून गुरुकृपा अनुभवणे
‘वर्ष १९९८ पासून मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागले. त्या वेळी मी, माझे यजमान (श्री. विलास गरुड), दोन्ही मुले (कु. विद्या आणि श्री. सागर) आम्ही सर्वजण एकत्रित सत्संगाला जायचो. त्यानंतर आम्ही सेवेला आरंभ केला. अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना बालसंस्कार वर्ग घेणे, घरोघरी प्रसार करणे इत्यादी सेवांच्या माध्यमातून गुरुदेवांची कृपा अनुभवली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा वाढण्यासाठी देवाने मुलांवर चांगले संस्कार करून घेणे
वर्ष १९९८ मध्ये मी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या अनुभूतींच्या ग्रंथांचे वाचन करायचे. मी अनुभूतींचा ग्रंथ उघडला की, प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यांसमोर एकच वाक्य यायचे, ‘मुलांना परम पूज्य डॉक्टरांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) श्रद्धा वाढवण्यास शिकवणे.’ त्याप्रमाणे मुलांवर तसे संस्कारही देवानेच करून घेतले.
३. मुलाचा अपघात झाल्यावर त्याने आई-वडिलांना संपर्क करण्याऐवजी आश्रमातील साधकांना दूरभाष करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या माध्यमातून मुलाचे रक्षण करणे
एकदा माझा मुलगा श्री. सागर गरुड सनातनचे संत पू. होनपकाका (कै. पू. होनपकाका) यांना सोडायला चारचाकी वाहन घेऊन पनवेलहून मुंबईला गेला होता. दुसर्या दिवशी त्याला महाविद्यालयात जायचे असल्याने तो त्यांना सोडून रात्री लगेच परत निघाला. रात्री १२ वाजता पनवेल येथे आल्यावर त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी उलटली. त्या वेळी तो गाडीत एकटाच होता, तरीही तो प्रयत्न करून बाहेर आला. त्याने गाडीत पडलेला भ्रमणभाष शोधला. मी आणि त्याचे बाबा दोघेही घरी असतांना त्याने आम्हाला संपर्क न करता आश्रमातील साधकांना भ्रमणभाष केला. आश्रमातील साधकही तेथे तत्परतेने पोचले. त्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार चालू केल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवले. तेव्हा या प्रसंगात प.पू. डॉक्टरांनीच त्याला त्या कठीण प्रसंगात बळ दिले आणि त्याचे रक्षण केले. यातून ‘आई-वडिलांपेक्षा देवच आधी साहाय्याला येतो’, हे शिकायला मिळाले.’
– सौ. विमल गरुड (वय ५३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |