|
सावंतवाडी – चालकाच्या अभावी बंद असलेल्या नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी वाहनचालक नेमून शहरवासियांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी शहरातील श्री. वीरेश ठाकूर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सौजन्य कोकणसाद लाईव
या निवेदनात श्री. ठाकूर यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषदेस स्थानिक आमदार निधीतून वर्ष २०२२ मध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र चालक नसल्याने ही रुग्णवाहिका गेले अनेक मास उभी करून ठेवण्यात आली आहे. चालक उपलब्ध नसल्याने आपत्कालीन स्थितीत नागरिकांची असुविधा होत आहे. ‘नगरपरिषदेची रुग्णवाहिका उपलब्ध हवी असल्यास एक घंटा आगाऊ कळवल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते’, असे कळले. अग्नीशमन यंत्रणेप्रमाणे रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होणे, हे रुग्णाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे या रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी २४ घंटे चालक राहील, याची दक्षता घ्याल, अशी आपल्याकडून अपेक्षा आहे, अन्यथा शहरातील एखाद्या सामाजिक कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थेला ही रुग्णवाहिका सुपुर्द करावी, जेणेकरून तिचा योग्य उपयोग होईल.
संपादकीय भूमिकाकायमस्वरूपी चालकासाठी मागणी का करावी लागते ? चालक नसेल, तर रुग्णवाहिकेचा रुग्णांना काय लाभ होणार ? |