पिंपरी-चिंचवड (पुणे) – येथील आनंदनगर झोपडपट्टीत ३ जणांनी कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांसह दहशत माजवत महिलेसह चौघांवर जीवघेणे आक्रमण केले. परिसरातील ८ ते ९ वाहनांची तोडफोड केली. सुभाष शिंदे, त्यांचे मामा साहेबराव म्हस्के, आत्या लक्ष्मी म्हस्के आणि बबन गायकवाड अशी घायाळ झालेल्यांची नावे आहेत. सुभाष शिंदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नरेश उपाख्य कृष्णा भंडारी, आदित्य आणि त्यांचा एक साथीदार अशी गुन्हा नोंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी वाहनांची तोडफोड करत होते. टोळक्याचा धुडगूस चालू असतांना तक्रारदार शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दहशत माजवत आरोपींनी नागरिकांवर आक्रमण केले. त्यानंतर नागरिकांनी तोडफोड करणार्यांना चोप दिला. यात आरोपी नरेश हा घायाळ झाला. चिंचवड पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :कोयता गँग नागरिकांवर आक्रमण करते, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? आतातरी पोलिसांगी कोयता गँगच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळायला हव्यात ! |